प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये होताच रेल्वे स्थानकावरील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:01+5:302021-03-18T04:29:01+5:30
गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. रेल्वे गाड्या, ...

प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये होताच रेल्वे स्थानकावरील गर्दी ओसरली
गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. रेल्वे गाड्या, बसेस यातून बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर रेल्वे स्थानकावर अनेकजण ५ रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढून वेळ घालवित होते. यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढली होती. हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन शेकडो प्रवाशी दररोज प्रवास करतात. रेल्वे स्थानकावर प्रवाशांशिवाय इतर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर आता ५० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज १५० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत होती. मात्र मागील तीन दिवसांपासून प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये केल्यानंतर केवळ ३० ते ४० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकावर होणार गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटात केलेल्या दरवाढीचा परिणाम दिसून येत असून बऱ्याच प्रमाणात गर्दी ओसरली आहे.
...........
सध्या दररोज किती रेल्वे धावतात
लॉकडाऊनपूृर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज ७५ हून अधिक रेल्वे गाड्या धावत होत्या. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर तीन महिने रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज ३२ रेल्वे गाड्या धावत आहेत. तर आठवड्यातून ७० गाड्या धावतात.
............
दररोज साधारण किती प्रवासी प्रवास करतात
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी दरराेज या रेल्वे स्थानकावरुन ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र आता केवळ दीड हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या काही विशेष रेल्वे गाड्या सुरु असून लोकल गाड्या बंद असल्याने प्रवासी संख्येत सुध्दा घट झाली आहे.
...
दररोज ३० ते ४० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये केल्यानंतर प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. दर वाढविण्यापूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज शंभर त दीडशे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत होती. आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे.
............
काेट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. याची गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी.
............
प्रतिक्रिया
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाने उचललेले पाऊल योग्य आहे. मात्र प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये केल्याने याचा इतर नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे हे दर थोडे कमी करण्याची गरज आहे.
- विलास डोये, प्रवासी
............
रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढवून रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याकडे सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे.
- विलास गणविर, प्रवासी.