मोदींची जादू चालणार की सोनियाजींचा चमत्कार
By Admin | Updated: October 12, 2014 23:35 IST2014-10-12T23:35:35+5:302014-10-12T23:35:35+5:30
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात

मोदींची जादू चालणार की सोनियाजींचा चमत्कार
गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात निवडणुकीत चुरस निर्माण झाली. विशेषत: सर्वांचे लक्ष लागलेल्या गोंदिया मतदार संघात कोण बाजी मारणार याची चर्चा लोक मोठ्या चवीने करताना दिसत आहेत. गोंदियात झालेली पंतप्रधान मोदींची सभा आणि शनिवारी झालेली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेची तुलना करून लोक निकालाचा अंदाज बांधू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेले पोषक वातावरण पाहता भाजपची तिकीट पदरी पाडून घेण्यासाठी गोंदियाच नाही तर सर्वच ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी होती. गोंदिया विधानसभा मतदार संघात गेल्या दोन-तीन वर्षात निर्माण झालेल्या पोषक वातावरणानंतर भाजपने ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची तयारी आधीपासूनच केली होती. अशातच युती तुटली आणि तयारीत असलेल्या भाजपने युवा उमेदवार विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देऊन तरुण वर्गाला कॅश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शिवसेनेने परंपरागत पद्धतीने निवडणूक रिंगणात आपले अस्तित्व कायम ठेवले असले तरी गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव शिवसेनेला या निवडणुकीत भोवत आहे. त्यामुळे मतदारांवरील सेनेची पकड ढिली झाल्याचे दिसून येत आहे. अशा वातावरणात प्रथमच विधानसभा लढत असलेल्या राजकुमार कुथे यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक (गप्पू) गुप्ता या नवख्या उमेदवाराला वेळेवर उमेदवारी दिल्याने त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. राकाँचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारात उतरून निवडणुकीत रंगत आणली असली तरी गुप्ता यांच्याकडे असलेला अनुभवाचा अभाव त्यांना किती मते मिळवून देईल हे सांगणे कठीण आहे.
काँग्रेसतर्फे किल्ला लढवत असलेले गोपालदास अग्रवाल यांना यावेळी आघाडी तुटल्याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो. पण १२ वर्षे विधान परिषद सदस्य आणि गेल्या १० वर्षांपासून विधानसभा सदस्य असलेले गोपालदास अग्रवाल हे आपला अनुभव आणि केलेल्या कामावर मतदारांकडून आशा ठेवून आहेत. परंतू राष्ट्रवादीची साथ नसल्यामुळे त्यांना एकाकीपणा किल्ला लढवावा लागत आहे.
अंतिम टप्प्यात मोदी आणि सोनिया गांधींच्या प्रचारसभांमुळे मतदारांना विचार करण्यास भाग पाडले. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले मोदींचे आकर्षण नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यांच्या सभेने एक प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्याना रिचार्ज केले. त्यातच भाजपमधील दुसऱ्या गटाला सक्रिय करून त्यांनी कामी लावण्याची जबाबदारीही मोदींनी जाता जाता खा.नाना पटोले यांना दिल्यामुळे कमळ की पंजा अशी तुलना मतदार करताना दिसत आहेत. आतापर्यंत चौरंगी वाटत असलेली ही लढत शेवटच्या क्षणी दुहेरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)