आदिवासी समाजातील ‘सोनझारी’ घटक उपेक्षितच

By Admin | Updated: April 12, 2017 01:19 IST2017-04-12T01:19:57+5:302017-04-12T01:19:57+5:30

आदिवासी समाजाचे वास्तव्य प्राचीन काळापासून आहे. आदिवासी जमातीमध्ये प्रवर्गाचे निकष पूर्ण करणाऱ्या जमाती असून ....

The 'Sonazari' component of the tribal community is neglected | आदिवासी समाजातील ‘सोनझारी’ घटक उपेक्षितच

आदिवासी समाजातील ‘सोनझारी’ घटक उपेक्षितच

शासनाने लक्ष द्यावे : ‘सोने’ शोधणाऱ्यांच्या जीवनाला मात्र कोळशाची किंमत

गोंदिया : आदिवासी समाजाचे वास्तव्य प्राचीन काळापासून आहे. आदिवासी जमातीमध्ये प्रवर्गाचे निकष पूर्ण करणाऱ्या जमाती असून यातील एक जमात ‘सोनझारी’ आहे. राज्यात, देशात वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात विखुरलेला, अल्पसंख्यांक समाज म्हणून वास्तव्यात असून आजच्या आधुनिक काळातही हा समाज उपेक्षितच आहे.
जमिनीत अलिप्त असलेले सोने या धातूचे एकेक कण गोळा करून शुद्ध सोन तयार करण्यात हा समाज तरबेज आहे. सोना-चांदी गाळणे, शुद्धीकरण करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्वच लहान-मोठे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका शहरातून दुसऱ्या शहराकडे सतत किमान वर्षातून आठ-दहा महिने भटके जीवन जगत आहेत.
मूळ वास्तव्यापासून दीर्घकाळ बाहेर जीवन जगत असल्यामुळे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित झाले आहेत. समाजाला शिक्षणाचा स्पर्श न झाल्यामुळे शिक्षणाच्या अभावी संपूर्ण सोनझारी समाज समस्यांनी ग्रासलेला आहे. पारंपरिक चालिरिती, अंधश्रद्धा, निकृष्ट राहणीमान, आरोग्यविषयक अज्ञान, वाढती व्यसनाधिनता अशा स्थितीत हलाखीचे जीवन जगत आहेत.
दुसऱ्याच्या जीवनात सोने-चांदीचे दागिने नटविणारा, आनंद फुलविणारा कुशल कामगार स्वत:चा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करू शकला नाही. अनेक ज्वलंत समस्यांमुळे सोनझारी समाजाची अधोगती सातत्याने वाटचाल सुरू आहे. ही अधोगती थांबावी व प्रगती व्हावी यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सोनझारी समाजाचे भटके जीवन समस्यांचे माहेरघर आहे. हा समाज त्याच परिस्थितीत सुखसमृद्धीची आशा उराशी बाळगून ध्येयरहित जीवन जगत आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ या योजनेत सदर समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासकीय यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. या दुर्लक्षित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून आदिवासी समाजाला मिळणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक हक्क सोनझारी समाजाला मिळवून द्यावे, तरच ती खरी अनुसूचित जमात म्हणून उद्यास येईल व सोनझारी समाजाचे भावी आयुष्य उज्ज्वल होईल. अन्यथा या समाजाचा दिवसेंदिवस ऱ्हास होतच राहील, अशी भावना या समाजाचे अभ्यासक संत ज्ञानेश्वर हायस्कूल बिहिरीयाचे शिक्षक जी.डी. पंधरे याांनी व्यक्त केली. खऱ्या आदिवासींच्या योजना खोटे आदिवासी बळकावत आहेत. अशीच वाटचाल राहिली व शासनाने दुर्लक्ष केले तर भविष्यात हा समाज नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

सोनझारी समाजाच्या समस्या
मूळ गावात वास्तव्य अल्पसे असल्यामुळे लहान मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण घेता येत नाही. पालकांमध्ये शिक्षणाबद्दल उदासिनता, त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित. अपवादाने मुलाने शाळेत प्रवेश घेतला तर इतर विद्यार्थ्यांशी समरस होत नाही. जात प्रमाणपत्र नसल्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. समाजात उच्च शिक्षित युवा वर्गाचा अभाव. शिक्षणाची जाणीवजागृती निर्माण करणारे प्रेरणास्त्रोत उपलब्ध नाही. शैक्षणिक पात्रतेच्या अभावी बौद्धीक-शैक्षणिक स्पर्धेत इतर आदिवासी जमातीसह सहभागी होत नाही. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा समाजाला लाभ घेता येत नाही. रेशनकार्ड, आधारकार्ड, बीपीएल कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र आदी आवश्यक बाबी नसल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपासून वंचित. अल्पसंख्यांक असल्यामुळे ग्रामपंचायत, नगर पंचायतमध्ये प्रतिनिधित्व नाही. अज्ञान व अशिक्षितपणामुळे समाजकंटकांकडून फसवणूक अशा अनेक समस्या आहेत.

Web Title: The 'Sonazari' component of the tribal community is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.