सोनालीच्या मृत्यूप्रकरणातील संशयित अजूनही मोकळा
By Admin | Updated: August 27, 2015 02:06 IST2015-08-27T02:06:32+5:302015-08-27T02:06:32+5:30
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीच्या संशयास्पद

सोनालीच्या मृत्यूप्रकरणातील संशयित अजूनही मोकळा
नेत्यांचा दबाव कुचकामी : तपास अधिकारी बदलविला
गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दिवसेंदिवस असंतोष वाढत असताना पोलिसांनी अजूनही संशयित आरोपीविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागामार्फत (सीआयडी) करावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकाकडून काढून तो सालेकसा ठाण्याचे निरीक्षक (ठाणेदार) एम.के. खंदारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरतीला जिवंत जाळून तिचा मृतदेह विहीरीत टाकण्यात आल्याचा संशय आहे. या संदर्भात मृत मुलीच्या नातेवाईकांनी गावातीलच तंटामुक्त समितीचा अध्यक्ष योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात तपासी अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत असल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास स्वत: सालेकसाचे ठाणेदार एम.के. खंदारे करीत आहेत.
योगराजने सहा महिन्यांपुर्र्वी आरतीशी प्रेमसंबंध जुळविण्याचा प्रयत्न केला होता. नेहमी तिच्या मागे-मागे जाऊन तिला त्रास द्यायचा. या प्रकरणाची तक्रार तिने आई वडिलांकडे केली. आईवडीलांनी या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार केली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तंटामुक्त समितीतून समजोता करा असे सांगून स्टँप पेपरवर चकोले याने याने यानंतर त्रास देणार नाही असे लिहून दिले होते.
या प्रकरणात आरतीचा छळ करणाऱ्या योगराजविरूध्द सर्व पुरावे तपासण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात मृत्यूचे स्पष्ट कारण नमूद न केल्यामुळे येणाऱ्या व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु आरतीच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे संशयित आरोपीचे नाव घेतले असताना पोलिसांना त्याच्या मोबाईल नंबरचे डिटेल्स किंवा इतर कोणतीही माहिती काढण्यासाठी इतका वेळ का लागत आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. संशयित आरोपीकडे नेमका कोणता मोबाईल नंबर होता याबाबतही माहिती घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, आ.संजय पुराम, जि.प. अध्यक्ष सविता पुराम यांच्यासह विविध संघटना आता या प्रकरणात कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र पोलिसांनी अद्यापही हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)