शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:59+5:302021-03-31T04:28:59+5:30
सडक-अर्जुनी : शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एम. मेश्राम यांच्या नेतृत्वात ...

शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडवा
सडक-अर्जुनी : शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एम. मेश्राम यांच्या नेतृत्वात गुरूवारी (दि.२५) खंड विकास अधिकारी मार्तंक खुणे व गट शिक्षणाधिकारी कैलाश सर्याम यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत, निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव तत्काळ जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावे हा विषय मांडण्यात आला. यावर तत्काळ दखल सर्याम यांनी प्राप्त प्रस्तावावर स्वाक्षरी करून पत्र बनवून जावकमध्ये दिले व जिल्हा परिषदेला पाठविण्याची व्यवस्था करण्याचे खोब्रागडे यांना आदेशित केले. सेवा पुस्तिका अद्ययावत करण्याच्या विषयावरील चर्चेत पुढील आठवड्यात कॅम्प लावण्याचे बी. टी. झिंगरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पत्र काढून दिनांक कळवतो असे सांगितले.
सडक-अर्जुनी जीपीएफ अपहार प्रकरणाचा विषय मांडला असता कार्यालयामार्फत संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन कार्यालयाकडून देण्यात आले. सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेला पाठविण्याच्या विषयात झिंगरे यांनी, सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच फुंडे ( तिडका) व येरणे (घाटबोरी) यांचे प्रस्ताव पुढील आठवड्यात पाठवितो असे सांगितले.
शिक्षण विभागाला लिपिक देण्याबाबत चर्चेत खुणे यांनी शिक्षण विभागाला एका लिपिकाची व्यवस्था करून देऊन शिक्षकांची कामे तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले. विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांप्रमाणे शाळेत मुख्याध्यापकांचा प्रभार देण्यात यावा याविषयी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार पुढील आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शाळांचे वीजबिल व रोजगार हमी योजनेअंतर्गत शाळांचे कामे सुरू करावे या विषयावर चर्चा करताना खुणे यांनी, ग्रामपंचायतस्तरावर नियोजनामध्ये शाळांचे वीजबिल हा विषय घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतसोबत संपर्क करावा, असे सांगितले.
विशेष म्हणजे, या चर्चेत शिक्षकांचे कित्येक विषय निकाली काढण्यात आल्याने संघाकडून खंड विकास अधिकारी कुणे व गट शिक्षणाधिकारी सर्याम यांचा डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वीजय डोये, वाय. एस. मुंगूलमारे, डी. आय. कटरे, अरुण शिवणकर, राहुल कोणतमवार, रवींद्र टेंभूर्णे, सुरेश अमले, घनश्याम मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते.