बिरसा मुंडांच्या विचाराने समाजक्रांती घडवा
By Admin | Updated: November 17, 2016 00:27 IST2016-11-17T00:27:01+5:302016-11-17T00:27:01+5:30
इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी

बिरसा मुंडांच्या विचाराने समाजक्रांती घडवा
संजय पुराम यांचे प्रतिपादन : रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुमदुमले आमगाव
आमगाव : इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी स्वत:चे प्राण देणारे वीर महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदर्श घडविला. इंग्रजांच्या अत्याचाराने खचलेल्या आदिवासी समाजाला एकत्रीत करुन क्रांती ज्योत पेटवली असे विचार आ. संजय पुराम यांनी व्यक्त केले.
आमगाव येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते. आदिवासी विद्यार्थी संघटना व आदिवासी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची ५४१ वी जयंती निमित्त आमगावात रॅली व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती श्रावण राणा, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, हनवत वट्टी, सुमन पेंदोर, गुलाबराव धुर्वे, डॉ. श्रीकांत राणा, पं. स. सदस्या हरविला मडावी, मधुकर बिहारी, रमेश भलावी, नरेंद्र वाजपेई उपस्थित होते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राणी दुर्गावती यांच्या तैलचित्रावर पुष्पांजली वाहून व दीप प्रज्वलन करण्यात आले.
पुढे आ. पुराम म्हणाले की समाज विकासाचे पाऊल पुढे करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षण संघटना व संघर्षातून न्याय मिळविण्याची ताकद बिरसा मुंडा यांनी दिली. त्यांच्या विचाराने समाज क्रांती घडवा असे प्रोत्साहन केले.
वाय.सी. भोयर यांनी आदिवासी बांधव या भूमीवरील मूलनिवासी आहेत. स्वातंत्र्य संघर्षातून निघालेला आपला समाज बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने पेटून उभा राहिला आहे. शिक्षण व विकास याचेद्वारे उघडे आहेत. याचा उत्तम लाभ मिळविण्यासाठी समाजाने मागे पडू नये. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी जल, जमीन व जंगल यावर प्रभूत्व निर्माण करुन ही संपदा कायम ठेवली. आपल्या संरक्षणाची जबाबदारी संघटन कौशल्याने पूर्ण करता येईल. ज्या बिरसा मुंडाने आदर्श घडविला त्यांच्या जयंती दिनाला राष्ट्रीय दिवस केंद्र व राज्य शासनाने घोषित करुन आदिवासींना सन्मान द्यावा, अशी मागणी केली.
अध्यक्ष श्रावण राणा यांनी आदिवासींच्या आरक्षणावर गैरआदिवासींनी गदा घालू नये. शासनाने आदिवासींना मिळणाऱ्या सोईवर प्रभावीपणे नियंत्रण घालावे. आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सोईवर गांभीर्याने दखल घ्यावी, विद्यार्थांच्या सुरक्षीततेसाठी अधिक उपाय योजना हाती घ्यावे असे मत व्यक्त केले. संचालन रमेश भलावी यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष संतोष पेंदोर, बाळा उईके, डॉ. श्रीकांत राणा, ऋषिश्वर राणे, मयाराम मेळे, राकेश परतेकी, सचिन उईके, सिमा उईके, यु.जी. फरदे व आदिवासी विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी, सदस्य यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)