समाजात सामाजिक समता रूजवावी

By Admin | Updated: April 10, 2017 01:15 IST2017-04-10T01:15:27+5:302017-04-10T01:15:27+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Social equality Rauzawi in society | समाजात सामाजिक समता रूजवावी

समाजात सामाजिक समता रूजवावी

अभिमन्यू काळे : सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ
गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रत्येकाने समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या शुभारंभ शनिवार (दि.८) करण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सप्ताहाचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) दाभाडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी समाजात समतेचा संदेश रूजविला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला समतेची वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व अभ्यासूवृत्तीने मन लावून अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय ठरवून शिक्षण घ्यावे. तरच स्वत:चे व सोबतच देशाचे नाव उज्ज्वल करता येईल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलभूत अधिकाराची जाणीव असायला पाहिजे. जीवनात प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये धीटपणा असायला हवा. पूर्वी जात, पंथ, भाषा यामध्ये समाज विखुरलेला होता. ब्रिटीश राजवटीला उलथवून लावण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली. समाजामध्ये जाती, धर्म न पाळता, एक मानव समाज व भारतीय समाज म्हणून जगावे. आपण सर्व समान आहोत, ही प्रत्येकाची एकमेकाप्रती वागणूक असायला हवी. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
धारगावे म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. व्यक्तीमत्वाची परीक्षा जातीवरून न करता त्याच्या गुणवत्तेवरून करावी. बाबासाहेबांची अभ्यासूवृत्ती विद्यार्थ्यांनी अंगिकारली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निव्वळ संख्या वाढू नये तर त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी पोलीस उपअधीक्षक दाभाडे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यामिनी लिल्हारे, रश्मी कामत व अशोक वाकले यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून वानखेडे म्हणाले, अनुसूचित जाती व सर्वप्रकारचे पीडित, शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, यासाठी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
संचालन प्रदिप ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंकेश केदार, खोडे, कळमकर, खरोले व लक्ष्मण खेडकर यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Social equality Rauzawi in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.