सालेकसा रुपेरी पडद्यावर
By Admin | Updated: February 26, 2017 00:30 IST2017-02-26T00:30:33+5:302017-02-26T00:30:33+5:30
आपल्या विविध वैशिष्ट्यांसाठी नेहमी प्रकाशझोतात राहणारा सालेकसा तालुका आता चित्रपटातही झळकणार आहे.

सालेकसा रुपेरी पडद्यावर
जुन्या सालेकसात चित्रपट निर्मिती : पुराम यांच्या हस्ते शुटिंगची सुरूवात
विजय मानकर सालेकसा
आपल्या विविध वैशिष्ट्यांसाठी नेहमी प्रकाशझोतात राहणारा सालेकसा तालुका आता चित्रपटातही झळकणार आहे. विशेष म्हणजे सालेकसा तालुका मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर असलेल्या जुना सालेकसा या छोट्याशा गावात ‘दिव्यांग’ या चित्रपटाचे चित्रीकरण केले जात आहे. आपले गाव आता रुपेरी पडद्यावर झळकणार म्हणून गावकरी हरखून गेले आहेत.
सालेकसा हे गाव नेहमी पडद्याआड राहिले आहे. मात्र ते आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दि.२३ रोजी चित्रपटाच्या शूटींगची मूहूर्तमेढ रोवण्यात आली. आ.संजय पुराम यांच्या हस्ते सुरूवात होताच चित्रपटाच्या सेटवर लाईट, कॅमरा, अॅक्शनला सुरूवात झाली. सालेकसा गावाला यामुळए उत्सवाचे स्वरूप आले आहे. संपूर्ण परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे.
सालेकसा या नावाबद्दल आणि महसूल रेकॉर्डबद्दल नेहमी एक संभ्रम राहीला आहे. तो म्हणजे सालेकसा हे एक तालुकास्थळ असून याच नावाने सर्व कामकाज चालत असते. परंतु महसूल रेकार्डवर कुठेही सालेकसा नावाचा उल्लेख नाही. तालुका मुख्यालयासह संपूर्ण सालेकसा शहर हा खऱ्या स्वरुपात आमगावखुर्द ग्राम पंचायतमध्ये मोडतो. येथील लोकांचे वास्तव्य व नागरिकत्व आमगाव खुर्द या ग्राम पंचायतीच्या रेकार्डप्रमाणे चालत असते. परंतु येथील सर्व शासकीय कार्यालय, व्यापार, रेल्वेस्टेशन, बसस्थानक व इतर सर्व घडामोडी सालेकसाच्या नावाने चालत असतात. मग खरा सालेकसा कोणता व कुठे आहे हा प्रश्नाबाबत संभ्रम अनेकांच्या डोक्यात नेहमी निर्माण होत राहीला. परंतु आता चित्रपटात मूळ सालेकसा लोकांना स्पष्ट माहित होईल. दिव्यांग चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या चमूला आमगाव खुर्द आणि सालेकसा या नावाशी तेवढे काहीही देणे घेणे नाही. मात्र जुना सालेकसा या गावाची निवड आणि त्याला महत्व देणे योगायोग आहे.
हिराज प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माण होत असलेला दिव्यांग चित्रपटाचे दिग्दर्शक दिलीप कोसरे आणि चित्रपट निर्माते रमेश फरकुंडे हे गोंदिया येथील असून त्यांच्या चमूतील इतर सहकारी महाराष्ट्राच्या इतर शहरातून तसेच रायपूर छत्तीसगड येथून आले आहेत. या चमूने दिव्यांग चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेताना या चित्रपटाची निर्मिती व चित्रीकरण गोंदिया, भंडारा जिल्ह्यातच करण्याचे ठरविले. एका अपंग मुलाच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाला दिव्यांग नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रेरणेने सूचली. अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग हा नवीन शब्द मोदी यांनी दिला. याचा मूळ हेतू असा की एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा शरीराचा एखादा अवयव निकामी किंवा कमजोर असला की त्याचवेळी त्याचा दुसरा अवयव जास्त प्रभावी बनतो. निकामी असलेल्या अवयवाचे कमतरता भासू देत नाही म्हणून त्याच्या दिव्यांग निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता दिग्दर्शकांनी दिव्यांग नाव देऊन अपंग मुलाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे ठरविले. चित्रपट निर्मितीच्या चमूने या शिर्षकाप्रमाणे त्यासाठी दिव्यांग मुलगा कसा असा असावा त्याचे गाव कसे असावे, परिसर कसावे, गाण्याचे चित्रीकरण इत्यादीची कल्पना करताना त्यांना दोन्ही जिल्ह्यात ग्रामीण भागात गावागावात भ्रमण करून पायपीट करावी लागली. परंतु त्यांना त्याच्या कल्पनेचा गाव सापडत नव्हता भ्रमण करता करता सालेकसा तालुका सुध्दा फिरले आणि शेवटी त्याच्या स्वप्नातला गाव सापडला तो म्हणजे सालेकसा. ज्याला आता जुना सालेकसा म्हणून ओळखला. परंतु ग्रा.पं.सालेकसाच्या रेकार्डवर सुध्दा त्यांचे स्वतंत्र अस्तीत्व नाही. परंतु हा गाव आणि परिसर दिग्दर्शकाला दिव्यांग चित्रपटासाठी शंभर टक्के योग्य वाटला आणि त्यांनी याच गावाची निवड केली. जुना सालेकसा आजही जून्या पध्दतीच्या कौलारू घराचा छोटासा खेडेगाव आहे. या गावात गरीब आदिवासी व इतर मागासलेले मोल मजूरी करणारे लोक वास्तव्यात असून हा गाव विकास पासून दूरच आहे. सालेकसाच्या नावाने अनेक विकास कामे शासनाच्या रेकार्डला आखले जातात. परंतु या खऱ्या सालेकसा गावात कधीच विकासाची वारे वाहताना दिसले नाही.
नावाचा घोळ कसा निर्माण झाला?
मुंबई-हावडा रेल्वे मार्ग बनला असताना या ठिकाणी रेल्वे स्टेशन देऊन त्याला नाव देण्याची वेळ आली. त्यापूर्वी आमगाव या नावाने रेल्वे स्टेशन बनले होते. त्यामुळे एकाच नावाचे दोन स्टेशन देता येत नव्हते. त्यावेळी इंग्रजांनी या परिसरातील चार पाच गावांची नावे जाणून घेतली. यात ४ किमी अंतरावर असलेले सालेकसा गाव लिहीन्यात व बोलण्यात इंग्रजांना सोपे वाटले. त्यामुळे या रेल्वे स्टेशनला सालेकसा नाव देण्यात आले. बाजारपेठ, कार्यालये व पत्रव्यवहार सालेकसा याच नावाने चालू लागला. मात्र महसूल रेकॉर्ड ग्राम पंचायत आमगाव खुर्द या नावाने कायम राहिली आहे.