रोहयोअंतर्गत लावलेल्या झाडांची महावितरणकडून कत्तल

By Admin | Updated: June 5, 2015 01:51 IST2015-06-05T01:51:24+5:302015-06-05T01:51:24+5:30

मान्सूनपूर्व विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करू नये म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येते.

Slaughter of Molybdenutic Trees | रोहयोअंतर्गत लावलेल्या झाडांची महावितरणकडून कत्तल

रोहयोअंतर्गत लावलेल्या झाडांची महावितरणकडून कत्तल

युवराज वालदे चिखली
मान्सूनपूर्व विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करू नये म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येते. मात्र फांद्या कापण्याच्या नावाखाली शतकोटी वृक्ष लागवट योजनेतील रोजगार हमी योजनेतून जगविण्यात आलेली झाडे बुंध्यापासून कापण्यात आल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत.
सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र देवरीअंतर्गत सन १२-१३ वर्षात कोहमारा, चिखली राज्य मार्गावर २.५० कि.मी. अंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बिहार पॅटर्ननुसार २५०० रोपटे लागवट करुन तीन वर्षात वृक्षात रुपांतर करण्यासाठी १६ लाख ८६ हजार ९१३ रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडांची योग्य वाढ करुन वादळ, ऊन, पाऊस व रोगांपासून ते जनावरांपासून सुरक्षित जगवून वृक्षात रुपांतर झाल्याने नुकतेच ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आले होते.
विद्युत विभागाने मात्र कोणतीही दया-माया न दाखविता बुंध्यासकट झाडे कापल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. शासन एकीकडे झाडे जगविण्यासाठी विविध योजना राबवित असताना शासनाचेच एक अंग असलेल्या वीज वितरण कंपनीकडून मात्र झाडे कापण्याचा सपाटा लावल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सामाजिक वनीकरण विभाग देवरी येथील वृक्ष लागवड अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ श्कला नाही. मात्र येथीलच एका कर्मचाऱ्याने वृक्ष ग्रामपंचायतला हस्तांतरीत झाल्याने आम्ही काही करु शकत नाही, असे सांगितले.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन शासनाच्या कार्यक्रमाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या महावितरण कंपनीला याबाबत जाब विचारावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Slaughter of Molybdenutic Trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.