कौशल्य विकास कार्यशाळा
By Admin | Updated: April 17, 2017 01:04 IST2017-04-17T01:04:28+5:302017-04-17T01:04:28+5:30
जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त

कौशल्य विकास कार्यशाळा
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवा : स्वयंरोजगाराकडे वळण्याचे आवाहन
गोंदिया : जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रविण खंडारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक संचालक समीर परवेज, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र मुंडासे, समितीचे सदस्य जयंत शुक्ला व प्रगतीशील शेतकरी महेंद्र ठाकूर उपस्थित होते.
यावेळी ठाकुर म्हणाले, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त कृषी क्षेत्र आहे. यासाठी कृषी तंत्रज्ञानातून कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे रुची बायोकेमिकल्स स्कील डेव्हलपमेंट बाबत माहिती दिली.
मुंडासे म्हणाले, देशात १२ हजार तर महाराष्ट्रात १२०० आयटीआयचे प्रशिक्षण घेवून बाहेर पडतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करावा. गोंदिया व भंडारा जिल्हा भात शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करु न शेती करावी, असे आवाहन केले. परवेज म्हणाले, तलावातील बेडूकली कमी करायचे आहे आणि मासोळीचे उत्पादन वाढवायचे आहे. जिल्ह्यातील मामा तलावाचे खोलीकरणाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात इटियाडोह जवळील गोठणगाव येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र आहे. जिल्ह्यात तलावांचा जो क्षेत्र आहे तो गोड्या पाण्याचा क्षेत्र आहे. जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती केली जाते. पाण्यातील आढळणारे जीवजंतूचे अवरुध्द पाण्यात संवर्धन केले जाते त्याला मत्स्यशेती म्हणतात. मत्स्यजीरे संगोपन पासून मत्स्यबीज प्राप्ती होते. मत्स्यबीज निर्मिती जास्त होईल तर मत्स्य उत्पादन जास्त होईल. त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राद्वारे मत्स्यव्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले.
मदन खडसे म्हणाले, नोकरीच्या संधी कमी आहेत, परंतू रोजगाराच्या संधी वाढत आहेत. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग कर्ज योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्र म योजना आहेत. या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईच्या विभा मिश्रा म्हणाल्या, उद्योजकता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. प्रथम एज्यूकेशन फाउंडेशनचे देशात १०० केंद्र आहेत. आतापर्यंत देशातील ४० हजार युवकांना रोजगाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. याद्वारे हॉस्पीटॅलिटी, इलेक्ट्रीकल व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही सांगितले. जिल्ह्यात गोंडी चित्रकलेचा प्रचार-प्रसार करण्याची चांगली संधी आहे. ही लोप पावत असलेली चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या व हौसी चित्रकारांच्या माध्यमातून जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी तितिरमारे यांनी फोर व्हीलर, टू व्हीलरचे प्रशिक्षण व अॅल्यूमिनियमचे दरवाजे बनविण्याचे, युवा परिवर्तन संस्थेचे हसनकुमार कोटांगले यांनी शेगळी दुरूस्ती करण्याचे प्रशिक्षण, गजानन उमरे यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर प्रशिक्षण, प्रिंटर दुरूस्ती, मोबाईल दुरूस्ती, ए.सी.दुरूस्ती प्रशिक्षण व नंदिकशोर साखरे यांनी हस्तशिल्प प्रशिक्षण देण्याचे सूचविले. प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रविण खंडारे यांनी केले. यशस्वीतेसाठी रोजगार मार्गदर्शन अधिकारी राणा माटे, सुरेश गणराज यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)