कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावा १९ व २० रोजी
By Admin | Updated: May 18, 2015 00:47 IST2015-05-18T00:47:46+5:302015-05-18T00:47:46+5:30
मार्गदर्शनाच्या अभावामुळे युवक-युवतींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. स्वयंरोजगाराची कास धरण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ....

कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावा १९ व २० रोजी
गोंदिया : मार्गदर्शनाच्या अभावामुळे युवक-युवतींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. स्वयंरोजगाराची कास धरण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळावी यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी पुढाकार घेऊन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी १९ व २० मे रोजी सकाळी ९.३० वाजता येथील पवार सांस्कृतिक भवन येथे अभिनव मोफत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यात ७८ प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ४९ विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांच्या व बार्टीच्या तज्ञ प्रतिनिधींची उपस्थिती व त्यांच्याकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांची पात्रता, कल व गुणवत्ता पाहून बार्टी यांच्याकडून कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी जागेवरच निवड करुन उमेदवारांचा प्रशिक्षणाचा हजारो रुपयांंचा संपुर्ण खर्च करणार असून उमेदवारांना प्रशिक्षणानंतर नोकरीची व पगाराची संधी मिळणार आहे.
अनुसूचित जमातीमधूनही अत्यंत गरजू व गुणवत्ताधारक उमेदवार मिळाल्यास, काही उमेदवारांची अनुसूचित जातीच्या उमेदवारांप्रमाणे निवड केली जाणार. तर खुला वर्गातील उमेदवारांची अनुसूचित जातीच्या उमेदवारांप्रमाणे निवड करुन संपुर्ण खर्च बार्टी करणार आहे. खुला प्रवर्ग, इतर मागासप्रवर्गीय, विभुक्त जाती व भटक्या जमाती मधून दारिद्रय रेषेखाली असलेल्या उमेदवारांची नोंदणी करुन त्यांनाही कौशल्य विकासाच्या माध्यमातून बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी ठराविक प्रशिक्षण मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे.
मेळाव्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास तसेच महामंडळाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व बँकेद्वारे त्यांच्या विविध योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)