सहा गावांना साथरोगांचा धोका

By Admin | Updated: July 18, 2016 00:10 IST2016-07-18T00:10:59+5:302016-07-18T00:10:59+5:30

पाण्यात पाहिजे त्या प्रमाणात क्लोरीन नसल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सहा गावांत जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.

Six villages with a hazardous risk | सहा गावांना साथरोगांचा धोका

सहा गावांना साथरोगांचा धोका

गोंदिया : पाण्यात पाहिजे त्या प्रमाणात क्लोरीन नसल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सहा गावांत जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील अहवालाच्या आधारावरून ही बाब उघडकीस आली आहे. यावरून या गावांत निकृष्ट दर्जाचे ब्लिचींग पावडर वापरण्यात आल्याचे स्पष्ट होते.
पाण्याची गुणवत्ता सोबतच जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचींग पावडरचा उपयोग ग्रामपंचायत कडून करण्यात येतो. त्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रत्येक महिन्याला जिल्हा प्रयोगशाळेत केली जाते. या पाण्यामध्ये ३३ टक्के क्लोरीन अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळून आले आहे. यावरून या गावांत निकृष्ट दर्जाचे ब्लीचिंग पावडर वापरण्यात आल्याचे दिसले.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जून महिन्यात पाण्याचे नमूने घेण्यात आले. यात आमगाव पंचायत समितीच्या ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चिरचाळबांध मध्ये ७.७५ टक्के, बासीपार येथे १७.०४ टक्के, गोरेगाव पंचायत समितीच्या सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या म्हसगाव येथे १६.६८ टक्के, घोटी येथे ७.७५ टक्के, सडक-अर्जुनी पंचायत समितीच्या पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या गिरोला येथे १२.४३ टक्के व चिचटोला येथे १५.६ टक्के क्लोरीन आढळले.
जिल्हा प्रयोगशाळेत ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातून ६, सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ८, पांढरी आरोग्य केंद्रातून ६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात ठाणाचे ३, सोनी २ व पांढरी चे २ नमून्यांमध्ये २० टक्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six villages with a hazardous risk