आरटीई अंतर्गत तिरोडा तालुक्यात सहा शाळांना मंजुरी
By Admin | Updated: May 31, 2014 00:00 IST2014-05-31T00:00:58+5:302014-05-31T00:00:58+5:30
भारत सरकारने शिक्षणाचा अधिकार २00९ पासून लागू केला. तेव्हापासून प्राथमिक ९ ते ४ वर्ग असलेल्या शाळेत ५ वा वर्ग जोडला जाणार आणि उच्च प्राथमिक वर्ग १ ते ७ शाळेत ८ वा वर्ग जोडला जाणार

आरटीई अंतर्गत तिरोडा तालुक्यात सहा शाळांना मंजुरी
काचेवानी : भारत सरकारने शिक्षणाचा अधिकार २00९ पासून लागू केला. तेव्हापासून प्राथमिक ९ ते ४ वर्ग असलेल्या शाळेत ५ वा वर्ग जोडला जाणार आणि उच्च प्राथमिक वर्ग १ ते ७ शाळेत ८ वा वर्ग जोडला जाणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षापासून होती. ती या वर्षी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. तिरोडा तालुक्यात आर.टी.ई. अंतर्गत सहा शाळांना मंजुरी देण्यात आली. यात प्राथमिक दोन व उच्च प्राथमिक चार शाळांचा समावेश आहे. काही शाळांशी पक्षपात झाल्याचेही निर्दशनात आले आहे.
आरटीई अंतर्गत तिरोडा तालुक्यात ज्या शाळांना जि.प. ने मंजुरी दिली आहे, त्यात चुरडी व मुरपार प्राथमिक शाळांना ५ वा वर्ग जुडणार आहे. तसेच घाटकुरोडा, भजेपार, चिरेखनी आणि गराडा या उच्च प्राथमिक शाळांना ८ वा वर्ग जुडणार आहे. आरटीई अंतर्गत वर्गाची बढती याच वर्षी शैक्षणिक सत्र २0१४-१५ पासून सुरु होणार आहे.
आईटीई अंतर्गत बढती वर्गाची जोडणी करण्याकरिता शासनाच्या शिक्षण विभागाने अटी घातल्या होत्या. त्यात तीन कि मीच्या आत शासकीय किंवा खासगी हायस्कूलची व्यवस्था नसावी. अशा ठिकाणी प्राथमिक शाळेत वर्ग ५ वा आणि उच्च प्राथमिक शाळेत ८ वा वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सहा शाळांना आरटीई अंतर्गत नवीन वर्ग उघडण्याची परवानगी देण्यात आली. यात शिक्षण विभागाने काही शाळांशी आणि गावांशी पक्षपात केल्याच्या तक्रारी निदर्शनात आल्या आहेत. शिक्षण विभगाने अलपुरी, चांदोरी (क) आणि बरबसपुरा या शाळांशी पक्षपात केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे.
ठाणेगाव आणि तिरोडा येथे हायस्कूलची व्यवस्था असून गराडा व मलपुरी या शाळांचा ठाणेगाववरून अंतर सारखाच आहे. तिरोड्यावरून हे अंतर गराडापेक्षा मलपुरी दूर अंतरावर आहे.
चांदोरी (बु) पासून हायस्कूलचे अंतर साडेतीन ते चार किमी आहे. बरबसपुरा या गावाला एकोडी आणि बेरडीपार येथे हायस्कूलची व्यवस्था असली तरी एकोडी हे गाव साडेतीन किमी आणि बेरडीपार हे गाव चार किमी अंतरावर असल्याने बरबसपुरा, चांदोरी (बु)., मलपुरी या शाळा सोडून आरटीई अंतर्गत वर्ग वाढवण्याची परवानगी दिली नसल्याने पालकांत नाराजी पसरली आहे.
सुरवातीला आटीई अंतर्गत जितक्या प्राथमिक शाळा आहेत, त्यात वर्ग ५ वा जोडण्यात येणार आणि उच्च प्राथमिक शाळेला ८ वा वर्ग जोडण्यात येणार असल्याच्या चर्चेला उत आला होता. मात्र तीन किमीची अट घालून लाभार्थी शाळेला नवीन वर्ग उघडण्याची मंजुरी दिल्याने सर्व चर्चांंंना विराम लागला आहे. ज्या शाळेवर अन्याय व पक्षपात करण्यात आला, त्याबाबत काही पालकांनी, शिक्षकांनी आणि पदाधिकार्यांनी जि.प. शिक्षण विभागाला विचारणा केली. तेव्हा अंतराचे माप नव्याने करण्यात आले असून कोणत्या माध्यमातून सोडण्यात आले याची सविस्तर माहिती नाही. अंतराच्या अटीत बसत नसल्याने सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. खासगी शाळांना वाचविण्याकरिता हे प्रयत्न तर नाहीत ना, अशी शंका पालकांनी व्यक्त केली आहे. वगळण्यात आलेल्या बरबसपुरा, चांदोरी (बु.) आणि मलपुरी या शाळांना तीन किमीच्या अटीनुसार आरटीआई अंतर्गत नवीन शाळा (वर्ग) उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी, शाळा व्यवस्थापन समित्याच्या पदाधिकार्यांनी केली आहे. (वार्ताहर)