मालगाडीतून कांद्यांची पोती चोरताना सहा जणांना पकडले
By Admin | Updated: December 13, 2014 01:36 IST2014-12-13T01:36:07+5:302014-12-13T01:36:07+5:30
स्थानिक रेल्वे स्थानकावर उभ्या कांदे वाहून नेणारी रेल्वेगाडी थांबविण्यात आली होती. नेहमीप्रमाणे मालगाडीतील साहित्य लंपास करणाऱ्या टोळीने ...

मालगाडीतून कांद्यांची पोती चोरताना सहा जणांना पकडले
गोंदिया : स्थानिक रेल्वे स्थानकावर उभ्या कांदे वाहून नेणारी रेल्वेगाडी थांबविण्यात आली होती. नेहमीप्रमाणे मालगाडीतील साहित्य लंपास करणाऱ्या टोळीने या मालगाडीवरही हात साफ करण्यासाठी सापळा रचला. रेल्वेगाडीच्या डब्ब्याचे कुलूप तोडून काद्यांची १८ पोती चोरुन नेताना रेल्वे पोलिसांनी सहा जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई १० डिसेंबरच्या मध्यरात्री घडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहीद कमर शेख (२७) रा. रामनगर, सलीम मुनाफ खान (२२) रा. न्यु. लक्ष्मीनगर, मुकेश रामलाल बसीने (४१) बाजार चौक, अमृतलाल सेवकराम आंबेडारे (४०) रा. रामनगर, विजय जगन्नाथ शर्मा (३८) रा. रामनगर, आदिल सब्बीर शेख (२१) रा. रामनगर यांचा समावेश आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात तसेच शहरातून गेलेल्या लोहमार्ग परिसरातील लोकवस्तीमध्ये रेल्वेगाडीमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची लूट किंबहूना मालगाडीतील माल लुटणारी टोळी सक्रीय आहे. अनेकदा कोळशा घेवून जाणाऱ्या रेल्वे गाडीचे कोळसा चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. परंतु रेल्वेच्या प्रवाशांना लुटणारी टोळीचा अद्याप गोंदिया पोलिस तसेच रेल्वे पोलिसांनी पकडले नाही. त्यामुळे रेल्वे परिसरात दिवसेंदिवस चोरट्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे.
१० डिसेंबरला कांदे भरुन जात असलेली रेल्वे मालगाडी गोंदिया स्थानक परिसरात थांबवून ठेवण्यात आली होती. नेहमीप्रमाणे या मालगाडीवर हातसाफ करण्यासाठी गेलेल्या उपरोक्त सहा चोरट्यांना १८ पोती कांदे चोरुन नेताना रंगेहात पकडण्यात आले. यावरुन सर्व आरोपीविरुद्ध गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही रेल्वे सुरक्षा बल प्रभारी बी.एन. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. एस.के. मडावी, एस.आय. विवेक मेश्राम, आरक्षक आर.डी. नानेकर, आर.सी. धुर्वे, एस.एस. कुशवाह, प्रधान आरक्षक बी.एस. छत्री यांनी केली आहे. मात्र या घटनेमुळे गोंदिया शहरात चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याची पितळ उघडे पडले आहेत. परंतु या चोरट्यांच्या टोळीला अभयदान देणाऱ्यांचे पितळ उघडे पडले नसल्याने खरा आरोपीच मोकाट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)