सहा कर्मचाऱ्यांवर न.पं.चा कारभार
By Admin | Updated: April 10, 2017 01:14 IST2017-04-10T01:14:04+5:302017-04-10T01:14:04+5:30
शासनाने तालुका स्तरावरील संपूर्ण ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला. २१ नोव्हेंबर २०१५ ला अर्जुनी नगर पंचायत उदयास आली.

सहा कर्मचाऱ्यांवर न.पं.चा कारभार
दीड वर्षात कामे शून्य : प्रभारी मुख्याधिकारी नॉट रिचेबल
अर्जुनी-मोरगाव : शासनाने तालुका स्तरावरील संपूर्ण ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला. २१ नोव्हेंबर २०१५ ला अर्जुनी नगर पंचायत उदयास आली. नगर पंचायत अस्तित्वात आल्याने नगराचा कायापालट होईल. सर्वांगीण विकास होईल, ही अपेक्षा प्रत्येकाची होती. परंतु सहा कर्मचाऱ्यांवर नगर पंचायतचा कारभार सुरू असून दीड वर्षात कामे शून्य आहेत.
गेल्या दीड वर्षात नाल्यांची सफाई व दिवाबत्ती व्यतिरिक्त न.पं. ने काहीही केलेले नाही. त्यामुळे नगरवासीयांचा भ्रमनिराश झाला आहे. न.पं.चा संपूर्ण कारभार सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. एवढेच नाही तर गोरेगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे येथील प्रभार आहे. सोबतच सडक-अर्जुनी येथीलही कामकाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. आकृतीबंधानुसार येथे वीज कर्मचाऱ्यांची गरज आहे. यामध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्ती करावयाची होती; मात्र पदाधिकाऱ्यांनी कारवाईच केली. जुन्या कर्मचाऱ्यांना दोनदा सर्वसामान्य सभेत कायम करून नवीन नियुक्ती करण्याची विनंती केली. अद्यापही ही मागणी प्रलंबित आहे.
येथे तीन स्थायी व तीन अस्थायी कर्मचारी, अशा सहा कर्मचाऱ्यांना कर वसुली, कार्यालयीन कामे, फेरफाराची कामे, स्वच्छतालयांची कामे, एवढेच नव्हे तर कॅशबुक, प्रोसिडींग लिहिणे, माहिती अधिकाराची माहिती देण्याचेही काम करावे लागतात. मात्र पगार त्यांना ग्रामपंचायत काळातील १५० रूपये प्रमाणेच दिला जातो. पगारवाढीबद्दलही सर्वसामान्य सभेत कर्मचाऱ्यांनी अर्ज केला. मात्र अजूनही यावर तोडगा निघाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
आकृतीबंधानुसार पुरेसे कर्मचारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अल्प मजुरीमुळे कर्मचारी त्रस्त आहेत. अपुरी कर्मचारी संस्था, अल्पवेतन व कामाचा ताण यामुळे नागरी सेवा, सुविधा व कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
मुख्याधिकारी नसल्याने नगरवासीयांच्या कामांचा खोळंबा होत आहे. घर बांधणी, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच नागरिकांना लागणारे विविध कार्यालयीन दाखले वेळेवर मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या विधानसभा क्षेत्राला मंत्रिपद मिळाले आहे. नागरिकांनी न.पं.च्या अवस्थेला पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घ्यावे, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
- नागरिकांच्या अनेक समस्या
उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी हॅन्डपंपची मागणी आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डासजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग व न.पं.ने डास निर्मूलन मोहीम राबवावे, अशी मागणी आहे.
नगरातील कित्येक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. माता माऊली रोड, अष्टविनायक नगर, शिक्षक कॉलनी, सिव्हील लाईन, गणेश नगर येथे पक्क्या रस्त्यांची मागणी आहे.
रात्रीला कित्येक प्रभागांमध्ये पथदिवे बंद नसल्याची ओरड आहे. बाजार वाडीतील हॅन्डपंप अनेक दिवसांपासून नादुरूस्त असल्याची माहिती आहे.
गावतलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरण कधी होणार? गणेश नगर येथील शेकडो वर्षे जुन्या बोळीचे खोलीकरण करून तिथे होणारे अतिक्रमण थांबविण्याची मागणी नागरिक करीत आहे.
शासनाने येथील कर्मचारी पदभरती व कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्तीची कामे तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे.