सरकारी कार्यालयांत सहा दिवस ठणठणाट
By Admin | Updated: November 14, 2015 02:03 IST2015-11-14T02:03:12+5:302015-11-14T02:03:12+5:30
सहकारी कर्मचाऱ्यांसाठी यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने परिपूर्ण ‘एन्जॉयमेंट’ ठरत आहे. एकही सुटी न काढता

सरकारी कार्यालयांत सहा दिवस ठणठणाट
गोंदिया : सहकारी कर्मचाऱ्यांसाठी यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने परिपूर्ण ‘एन्जॉयमेंट’ ठरत आहे. एकही सुटी न काढता आयत्याच सलग सहा दिवस सुट्या मिळाल्याने सरकारी कार्यालये तब्बल सहा दिवस ओस पडून राहणार आहे.
या आठवड्यातील सोमवार सोडला तर सलग ‘संडे टू संडे’ आठ दिवसांची सुटी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. केवळ सोमवारी दि.९ ला एकच दिवस कार्यालयात जायचे असल्यामुळे लांबच्या जिल्ह्यात मूळ गाव असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सुटी आधीच टाकली. त्यामुळे ते ‘संडे टू संडे’ सुटीचा आनंद घेत आहेत.
मंगळवारी दि.१० ला नरक चतुर्दशीला जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली. दि.११ ते १३ लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबिजेनिमित्त तीन दिवस सरकारी सुटी आहे.
दि.१४ ला दुसऱ्या शनिवारची सुटी तर दि.१५ ला पुन्हा रविवारची सुटी. त्यामुळे थेट दि.१६ शिवाय कोणतेही सरकारी कार्यालय उघडले जाणार नाही. या सलग सुट्यांमुळे गोंदिया जिल्ह्यात नियुक्तीवर असलेल्या पुणे, मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना सोयीचे झाले. काही कर्मचाऱ्यांनी या सुट्यांमुळे प्रवासाचे बेत आखले आहेत. सोबत आपल्या काही सुट्या टाकून हे कर्मचारी लांबच्या सहलीवर गेले आहेत. कर्मचारी अशा पद्धतीने सहा दिवस दिवाळीचा आनंद घेत असले नागरिकांची मात्र बरीच गैरसोय होणार आहे. दि.१६ नंतरही तीन-चार दिवस अनेक जण सुट्यांवर राहतील. (जिल्हा प्रतिनिधी)