राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सिरेगावबांध पंचायत समिती सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST2021-04-26T04:26:04+5:302021-04-26T04:26:04+5:30
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्यातील एकमेव ग्रामपंचायत सिरेगावबांधला सन २०२० - २१चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ...

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सिरेगावबांध पंचायत समिती सन्मानित
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्यातील एकमेव ग्रामपंचायत सिरेगावबांधला सन २०२० - २१चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर दुसऱ्यांदा राज्यस्तरीय चाईल्ड फ्रेंडली पुरस्कारसुद्धा मिळाला. केंद्र शासनाचा चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील सिरेगावबांध एकमेव ग्रामपंचायत आहे.
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या स्वाक्षरीने सन २०१९ - २० या वर्षाचा पुरस्कार दिनांक २४ एप्रिलला गोंदिया येथील जिल्हा परिषद पंचायत राज विभाग येथे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम सिरेगावबांधचे सरपंच, इंजिनीयर हेमकृष्ण संग्रामे उर्फ दादा पाटील, ग्रामसेवक टी. टी. निमजे, लोकपाल गहाणे यांच्याकडे हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला आहे.
अर्जुनी - मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजू वलथरे, टी. टी. निमजे व पंचायत समितीचे इतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सहकार्य राहिले आहे. हा पुरस्कार गावातील लहान बालके त्यांचा विकास, त्यांच्या शाळेत सर्व सोयी सुविधा पुरविणे, गावातील कोणतेही बालक कुपोषित राहणार नाही, यासाठी ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत असून, बालक जन्माला येण्यापासून त्याला मूलभूत सुविधा पुरविणे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना पोषण आहार देण्याचे कार्य करीत आहे. संपूर्ण सिरेगाव बांधवांशी जनता एकजुटीने गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतात. कोणीही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याचीसुद्धा काळजी घेतली जाते.
.....
कोट
बालकांचा शैक्षणिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडीतील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी सदैव कार्यरत असतात. सिरेगावबांध ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. आम्ही यानंतरसुद्धा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व संपूर्ण गाव विकासासाठी नेहमीच झटत राहू.
- हेमकृष्ण संग्रामे, सरपंच, सिरेगावबांध
......
हा तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव
सिरेगावबांध ग्रामपंचायतीला यापूर्वी केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका जिल्हा नागपूर विभागातून पुरस्कार आणि केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचे सरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे उर्फ दादा पाटील यांचे नेतृत्व, उपसरपंच हिरालाल मसराम व ग्रामपंचायत सदस्य यांची सतत धडपड मोलाची आहे.