महोदय, सुपरफास्ट रेल्वे कशाला? सामान्यांची पॅसेंजर सुरूकरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:46+5:302021-03-19T04:27:46+5:30
मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून गोंदिया-बल्लारशा व ...

महोदय, सुपरफास्ट रेल्वे कशाला? सामान्यांची पॅसेंजर सुरूकरा!
मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून गोंदिया-बल्लारशा व जबलपूर ही सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पण या गाडीचा या परिसरातील प्रवाशांना काहीच उपयोग नाही. म्हणून रेल्वे प्रशासनाला सर्वसामान्य जीवन जगणारा महोदय, सुपर रेल्वे कशाला? सामान्य नागरिकांची पॅसेंजर रेल्वे सुरू करा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
कोरोनाचा धोका कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. कोरोनाने अनेक दारिद्र्यरेषेखालील व सामान्य नागरिकांचे जगणे हलाखीचे केले आहे. अशातच कामासाठी बाहेर पडणारी जनता ही गरीब आहे, अशा परिस्थितीत जीवन जगताना जनतेला अनेक संकटांना तोंड देत जगावे लागते. प्रशासनाने रेल्वे ही सर्व सामान्य स्तरावर जगणाऱ्या नागरिकांसाठी पॅसेंजर व लोकल अशा रेल्वेची सुविधा केली. गोंदिया-वडसा-नागभीड-बल्लारशा ही पॅसेंजर अनेक वर्षांपासून धावत होती. ती कोरोनाने बंद झाली. सुरूच करायची होती, तर पॅसेंजर सुरू करावी. सुरू झालेली सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अजिबात कामाची नाही, असा खडाजंगी सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सवलती, योजनांसह पुरेशा सुविधा या सामान्यांच्या हक्काच्याच आहेत व असतात, हे तर हे प्रशासनाने जाणून घ्यावे.
.....
सामान्यांसाठी रेल्वेच उत्तम
सध्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दळणवळणाच्या साधनापैकी केवळ रेल्वे परवडण्यासारखी आहे. प्रवासही सुखकारक होतो. म्हणून रेल्वेच आम्हासाठी उत्तम आहे, असे प्रवासी सांगतात.
-----------------------
आम्हाला वडसा, ब्रम्हपुरी महाविद्यालयांत जाण्यासाठी आजही सोयीचे साधन नाही. बस वेळेवर येत नाही, तर तिकीटसुध्दा अधिक असल्याने ते परवडत नाही. म्हणून पॅसेंजर सुरू करावी.
- अंजली दिरबुडे, विद्यार्थिनी, चान्ना
===========
तालुक्याच्या व शहराच्या ठिकाणी जायला बस किवा इतर साधने परवडत नाही. आपले काम करून येणे-जाणे सोयीचे नाही, भाजीपाला घेण्यासाठी लांब जाणे फायदेशीर नाही.
- डी. बी. कांबळे, भाजीपाला व्यावसायिक
------------
नागरिकांसाठी पॅसेंजर सुरू करावी. जनता आता हतबल झाली आहे. म्हणून पॅसेंजर व लोकल सुरू करण्याची मागणी बाराभाटी, येरंडी-देवलगाव, कवठा, डोंगरगाव, बोळदे, ब्राम्हणटोला, चापटी, सुरगाव, पिंपळगाव, कुंभीटोला या गावांतील गावकरी करीत आहेत.