लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान-लहान तलाव, बोड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या शिंगाडा पिकाला फळे व भाजीपाला संवर्गातील कृषी पीक म्हणून २९ एप्रिल २०२५च्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इतर कृषी पिकांना अनुज्ञेय असलेल्या लाभ व सवलती शिंगाडा पिकाला मिळणार आहेत.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत शिंगाड्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या शिंगाड्यापासून उच्च पोषणमूल्ये असणारे विविध उपपदार्थ तयार केले जातात. शिंगाडे कच्चे व उकडून देखील खाल्ले जाते. ढिवर, भोई, कहार समाजबांधव शेतीसह दुय्यम पीक घेतात व त्याची गावोगावी बाजारात विक्री करतात. त्यातून हंगामी आर्थिक फायदा विक्रेत्यांना होतो. मात्र, आतापर्यंत शिंगाडा फळाचा कृषी पिकामध्ये समावेश नसल्याने शिंगाडा उत्पादक शेतकऱ्यांना इतर पिकांसाठी लागू असलेल्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. सद्यःस्थितीत पणन विभागाने अधिसूचनेद्वारे 'शिंगाडा' याचा शेती उपजांचे कलम २ (१-अ) खालील अनुसूचीमध्ये समावेश केला आहे. शिंगाडा पिकास इतर कृषी पिकांना अनुज्ञेय असलेल्या लाभ, सवलती मिळतील. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्त यांच्या स्तरावरून काढण्यात करण्यात येणार असल्याची माहिती या शासन निर्णयात देण्यात आली आहे.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या शिंगाडा हा फळ मासेमार समाजाचा पिढ्यानपिढ्यापासून मासेमारीबरोबरच चालत असलेला जोड धंदा आहे. हा व्यवसाय लहान बोड्या किंवा तलावामध्ये केला जातो. याचे उत्पादन नोव्हेंबर ते मार्चपर्यंत घेतले जाते. या व्यवसायातून मासेमार समाजातील काही कुटुंबाला वर्षाला ३० ते ४० हजार आर्थिक मदत होते.
बहुगुणी शिंगाडाशिंगाडा (वाटर चेस्टनट) थंड असतो आणि शरीराचे तापमान राखण्यास मदत करतो, त्यामुळे तो उन्हाळ्यात किंवा उपवासाच्या काळात खाण्यासाठी चांगला असतो. शिंगाड्याच्या सेवनाने शरीराची ऊर्जा वाढते आणि भूक न लागणे किंवा अधिक भूक लागणे यांसारख्या समस्या दूर होतात. शिंगाड्यात फायबर असते, जे पचन प्रक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. शिंगाडा अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, मॅगनीज, प्रथिने, थायमिन आणि इतर पोषक घटक असतात. शिंगाडा खाल्ल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते.
"शिंगाड्याला राज्य शासनाने फळ व भाजीपालावर्गीय पीक म्हणून मान्यता दिली आहे. ही आनंदाची बाब आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात व जिल्ह्यात शिंगाडा पीक लागवडीला अधिक प्रोत्साहन मिळेल. नैसर्गिक किंवा रोगराईमुळे शिंगाड्याचे नुकसान झाले, तर आतापर्यंत कुठलीही आर्थिक भरपाई किंवा लाभ मिळत नव्हता. आता ती मिळण्यास मदत होईल."- सरिता मेश्राम, सदस्य मत्स्य व तलाव महिला उत्पादक गट, सावरटोला
"या व्यवसायालाही शेतीतील पिकांप्रमाणेच दर्जा मिळाला पाहिजे तसेच शेती व्यवसायाला शासनाकडून मिळत असलेल्या सर्व सोयी सुविधा या व्यवसायाला मिळाले पाहिजेत. जेणेकरून या व्यवसायाला अधिक चालना मिळेल."- नंदलाल मेश्राम, तलाव उत्पादन तज्ज्ञ, जांभळी येलोडी