सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

By Admin | Updated: April 29, 2016 01:48 IST2016-04-29T01:48:35+5:302016-04-29T01:48:35+5:30

एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे.

Shubhamangal of 27 couples | सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

सर्वधर्र्मीय सामूहिक विवाह : सामाजिक बांधिलकी जोपासणारी ११ वर्षांची परंपरा
गोंदिया : एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे. चक्रधर स्वामींच्या या पावन भूमित सर्व जातीधर्माच्या जोडप्यांचे विवाह एका मंडपात करण्याची ही परंपरा सामाजिक बांधीलकी जोपासणारी आहे. यातून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होत असून असंख्य गोरगरीबांचे लग्न थाटामाटात लावले जात असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. अशा उपक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत, अशा शब्दात मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुकडी डाकराम येथे बुधवारी सायंकाळी भरगच्च नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अत्यंत उत्साहात पण तेवढ्याच शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मिय १९ आणि बौद्ध धर्मिय ८ जोडप्यांचे शुभमंगल झाले. विशेष म्हणजे त्यात २ आंतरजातीय विवाहसुद्धा होते.
या सोहळ्याला अतिथी म्हणून आ.राजेंद्र जैन, वर्षा पटेल, मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड, माजी आ.भजनदास वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर.शेंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन, मदन पटले, जिल्हा बँकेचे संचालक राधेलाल पटले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, जि.प.सदस्य पटले, गोरेगाव पं.स.सदस्य केवलराम बघेले, डॉ.नामदेव किरसान, पंचायत समिती सभापती शकुंतला परतेकी, अदानी फाउंडेशनचे सुबोधसिंग, तसेच श्रीकृष्ण धर्म व पारमार्थिक आयोजन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. चक्रधारी स्वामीच्या मठ परिसरात उभारलेल्या भव्य शामियान्यात सायंकाळी ५ वाजता या विवाह सोहळ्यास सुरूवात झाली. सुरूवातीला या सोहळ्याचे मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड यांनी प्रास्ताविकातून ११ वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. सर्वांच्या सहकार्यातून ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महानुभवाव पंथाचे प्रमुख साळकर बाबा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ८०० वर्षापूर्वी हे मंदिर तयार झाले. येथे पूर्वी फक्त दुखी कष्टी लोकच येत होते. पण गोरगरीबांचे विवाह होत नव्हे. पण आज अशा सर्वधर्मिय विवाह सोहळ्यातून गोरगरीबांच्या संसाराची सुरूवात होत आहे ही गोष्टी फार महत्वाची असल्याचे ते म्हणाले. या विवाह सोहळ्यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन त्याच ठिकाणी केले होते. हजारो वऱ्हाडाने शांततेत भोजन ग्रहण केले. (जिल्हा प्रतिनिधी)

प्रत्येक जोडप्याला मिळाल्या भेटवस्तू
या सोहळ्यात एकूण २६ जोडप्यांची नोंदणी झाली होती. मात्र सर्व तयारीनंतर आलेल्या एका जोडप्यालाही समाविष्ठ करण्यात आले. ठरल्यानुसार त्या सर्व जोडप्यांना आलमारी, पलंग, गादी यासह इतर संसारोपयोगी १२ वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या वस्तूंसाठी माजी आ.दिलीप बन्सोड, अर्चनाताई बन्सोड यांच्यासह बबनदास रामटेके, अमृतलाल असाटी, राजेंद्र अग्रवाल, चंद्रशेखर गजभिये, शतुंतला परतेकी, जगन धुर्वे, राजेश कटरे, गजानन नंदागवळी तसेच अदानी फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली.

Web Title: Shubhamangal of 27 couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.