शाळाबाह्य मूल दाखवा; एक हजार मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 01:55 IST2016-02-11T01:55:18+5:302016-02-11T01:55:18+5:30
आरटीई कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे.

शाळाबाह्य मूल दाखवा; एक हजार मिळवा
नरेश रहिले गोंदिया
आरटीई कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्यामुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शाळाबाह्य मुले दाखविणाऱ्यास एक हजार रूपये बक्षीस देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी १ मार्चपासून करण्यात येणार आहे.
राज्यातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार आता शाळाबाह्य मुला-मुलींच्या शोधासाठी अभियान चालविला जाणार आहे. जो व्यक्ती शाळाबाह्य मुलगा दाखवील त्याला एक हजार रूपये बक्षीस दिले जाणार आहे. सदर आदेश राज्यात १ मार्च पासून लागू होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षात वर्ग १ ते ८ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकांची संख्या एक लाख ७४ हजार ४४० होती. आरटीई कायद्यांतर्गत दुसऱ्या वर्षात सत्र २०१५-१६ तेवझेच विद्यार्थी दुसऱ्या वर्षात येणे अपेक्षित होते. परंतु ५ हजार ७४१ बालकांची संख्या घटलेली आहे. या वर्षी एक लाख ६८ हजार ६९९ बालकांचे नाव शाळेत दाखल आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यात २ हजार २८७ विद्यार्थ्यांनंी शिक्षण सोडले. ही बालके गेली कुठे यासंदर्भात शोध घेऊन त्यांना पुन्हा शाळेत दाखल करावे यासाठी त्यांची शोध मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गैरहजर असलेल्या बालकांची संख्या २ हजार २८६ आहे. यात आमगाव तालुक्यात ४४, अर्जुनी-मोरगाव २०६, देवरी ३९३, गोंदिया ७२२, सडक अर्जुनी २८७, सालेकसा २५७ व तिरोडा तालुक्यात ४१८ बालके कमी आढळली. यात गोरेगाव तालुक्यात ४१ बालके वाढलेली आहेत. सदर माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला दिली आहे.
एनएसएसच्या विद्यार्थ्यानी शोधले १०५ बालके
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रावहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने त्यांची शोध मोहीम अनेकदा राबविली आहे. १ ते ३० जानेवारी दरम्यान शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. त्यात १०५ विद्यार्थी जिल्हाभरात आढळले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७,गोंदिया ६२, गोरेगाव २७, सालेकसा २, सडक अर्जुनी ७ मुले शाळाबाह्य आढळली.