धान खरेदी केंद्रावर बारदान्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:24+5:302021-02-09T04:32:24+5:30
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड वाढली ...

धान खरेदी केंद्रावर बारदान्याचा तुटवडा
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड वाढली आहे. पण, शासनाकडून बारदाना खरेदीसाठी निविदा काढण्यास दिरंगाई केली जात असून, यातील कमिशनसाठी बारदाना खरेदीची निविदा प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे. पण, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने धान खरेदी सुरू आहे. या दोन्ही विभागांची एकूण ११४ धान खरेदी केंद्रे सुरू असून, या दोन्ही विभागांनी आतापर्यंत २५ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. राईस मिलर्सने धानाची भरडाईसाठी उचल करणे बंद केल्याने खरेदी केंद्रावर धानाचा खच पडला आहे. त्यामुळे धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यातच आता या दोन्ही विभागांच्या खरेदी केंद्रावर धान खरेदीसाठी बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यास अडचणीचे ठरत आहे. बारदान्याचा तुटवडा असताना शासनाने मात्र अद्यापही बारदाना खरेदीसाठी निविदा प्रक्रिया काढली नाही, तर कमिशनमुळे ही प्रकिया रखडल्याची चर्चा आहे. एकंदरीत शासन आता यावर काय तोडगा काढते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.