दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ आरोग्य सेवकांची कमतरता

By Admin | Updated: August 28, 2014 23:53 IST2014-08-28T23:53:55+5:302014-08-28T23:53:55+5:30

गोरगरिबांच्या आरोग्यासाठी शासनाने शहरात जिल्हा व तालुका रूग्णालयांची सोय केलेली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व साधारण लोकसंख्येच्या गावांसाठी उपकेंद्रांची सोय केलेली आहे.

Shortage of 11 health workers in two primary health centers | दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ आरोग्य सेवकांची कमतरता

दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ आरोग्य सेवकांची कमतरता

काचेवानी : गोरगरिबांच्या आरोग्यासाठी शासनाने शहरात जिल्हा व तालुका रूग्णालयांची सोय केलेली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व साधारण लोकसंख्येच्या गावांसाठी उपकेंद्रांची सोय केलेली आहे. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ आरोग्य सेवकांची कमतरता आहे.
तिरोडा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यात इंदोरा बु, सुकडी/डाकराम, वडेगाव व मुंडीकोटा या केंद्रांचा समावेश आहे. यापैकी सुकडी/डाकराम व इंदोरा बु. या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सदर पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेसाठी समस्या निर्माण होत आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात काडीकचरा सडून त्या ठिकाणी किडे व जंतू तयार होवून मानवी जीवनाला गंभीर धोका निर्माण करतात. ताप, सर्दी, विषमज्वर, हिवताप, डेंग्यू, पोटदुखी, हागवण, हत्तीरोग, काविळ आदी आजार पसरत असल्याचे दिसूून येत आहे. अशावेळी आरोग्य विभागाने सजगतेचा इशारा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे होते.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामीण क्षेत्रात हवी तशी सेवा किंवा उपचार नागरिकांना मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामागे कर्मचाऱ्यांची धावपळ व कर्मचाऱ्यांची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत गावोगावी आजारांचे प्रमाण वाढले आहे. काही घरांत संपूर्ण कुटूंब तर काही कुटुंबातील दोन ते तीन व्यक्ती आजारी आहेत. अशावेळी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूग्णांची व रोगाची माहिती घेवून उपचारात्मक सल्ला देवून त्या-त्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आजही अनेक सुविधा आरोग्य केंद्रांत व उपकेंद्रांत उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात असणाऱ्या आरोग्य यंत्रणा गरिबांसाठी केवळ नावापुरत्याच ठरल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागही ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (वार्ताहर)

Web Title: Shortage of 11 health workers in two primary health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.