थकबाकीदारांचे दुकान केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:05+5:30
नगर परिषदेचा कारभार चालविण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची दुकाने व मालमत्ता कर हे दोनच मोठे उत्पादनाचे स्त्रोत आहेत. मात्र गोंदिया नगर परिषद मालमत्ता कर वसुलीत बरीच पिछाडलेली असल्याने मालमत्ता कराची थकबाती वाढतच चालली आहे. यंदा तर मागणी पेक्षा थकबाकी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.

थकबाकीदारांचे दुकान केले सील
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वारंवार मागणी करूनही नगर परिषद दुकानांचे भाडे व मालमत्ता कर थकविणाºया दोन दुकानदारांच्या दुकानांना नगर परिषदेच्या वसुली पथकाने गुरूवारी (दि. ५) सील ठोकले. मुख्याधिकारी घुगे यांन बैठकीत वसुलीसाठी बिनधास्तपणे काम करण्याचे निर्देश दिल्याने कर्मचाऱ्यांनीही दुकानदारांना दणका दिला. यात वेळीच एका दुकानदाराने पैसे भरल्याने त्याला सूट देण्यात आली.
नगर परिषदेचा कारभार चालविण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची दुकाने व मालमत्ता कर हे दोनच मोठे उत्पादनाचे स्त्रोत आहेत. मात्र गोंदिया नगर परिषद मालमत्ता कर वसुलीत बरीच पिछाडलेली असल्याने मालमत्ता कराची थकबाती वाढतच चालली आहे. यंदा तर मागणी पेक्षा थकबाकी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगर परिषदेचे पथक वसुलीसाठी गेल्यावर एखाद्या नेत्याचा किंवा नगर परिषद सदस्य वा पदाधिकाºयाचा फोन येतो व तेथून पथकाला रिकाम्या हाती परतावे लागते अशी स्थिती आहे. परिणामी वसुली होत नाही व त्याचा प्रभाव नगर परिषदेच्या अन्य कारभारावर पडतो.
नगर परिषदेला लागलेले हे ग्रहण सुरू असतानाच सध्या नगर परिषदेचा कारभार सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना सोपविण्यात आला आहे. कारभार हाती घेताच त्यांनी नगर परिषद कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांच्या कामाची पद्धत दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. घडीच्या काट्यावर कार्यालयात येवून रात्री उशीरापर्यंत बसून ते नगर परिषदेवर लक्ष ठेवून आहेत. यातच प्रत्येकच विभागातील कामाचा आढावा ते घेत आहेत. त्यातच नगर परिषद कर विभागाची स्थिती जाणून घेतल्यावर त्यांनी शनिवारी (दि.३०) मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला. यात त्यांनी कर वसुलीसाठी कारवाई करण्याचे निर्देश कर्मचाºयांना दिले. कुणीही मधात आल्यास स्वत: ते हाताळणार असे ही सांगीतले आहे.
अधिकाºयांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे गुरूवारी (दि.५) कर वसुली पथकाने नगर परिषद दुकानांचे भाडे व मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी हाती घेतली. तसेच त्यांनी इंदिरा गांधी स्टेडियममधील दुकान क्रमांक १६ मधील सारथी कलेक्शन या दुकानाला सील ठोकले. दुकान संचालक किशोर लारोकर यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी मागील सुमारे दोन वर्षांची सुमारे १.७५ लाखांची थकबाकी न भरल्याने पथकाला ही कारवाई करावी लागली. शिवाय फुटपाथवरील दुकान क्रमांक ६ मधील परमात्मा एक फुटवेअर या दुकान संचालक प्रकाश तांडेकर यांच्याकडे सुमारे २० हजार रूपयांची थकबाकी असल्याने त्यांच्या दुकानालाही सील करण्याची तयारी केली. मात्र त्यांनी वेळीच पैसे भरल्याने त्यांना सोडण्यात आले. तर सायंकाळ पर्यंत तीन दुकानांना सील करण्यात आल्याची माहिती आहे.
याप्रसंगी कर वसुली अधिकारी व उप मुख्याधिकारी विशाल वनकर, कर निरीक्षक प्रदीप घोडेस्वार, श्याम शेंडे, मुकेश मिश्रा, संजय चौबे, सुधीर भैरव, अज्जू मिश्रा, शेखर शर्मा, दिनेश शुक्ला व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
टार्गेट ९.७६ कोटी मालमत्ता कर वसुलीचे
नगर परिषदेला यंदा नऊ कोटी ७६ लाख ५० हजार १४ रूपयांची मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. विशेष म्हणजे, यात पाच कोटी १४ लाख ६६ हजार ९५ रूपयांची मागील थकबाकी असून चार कोटी ६१ लाख ८३ हजार ९१९ रूपयांची यंदाची मागणी आहे. म्हणजेच, मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातही कर स्वरूपातून नगर परिषदेला येणारे उत्पन्न यात समाविष्ट नाही. मात्र त्यांचीही कोट्यवधींच्या घरात थकबाकी आहे. आता घुगे यांच्या नेतृ्वात वसुली कर्मचारीही नव्या जोशात दिसल्याने याचा नक्कीच फायदा मिळणार असे दिसते.