लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा खजरीजवळ झालेल्या शिवशाही बस अपघातप्रकरणी शासन व परिवहन विभाग गंभीर असून, या अपघातातील बारकावे व इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी या अपघाताची थर्ड पार्टी चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था अपघात स्थळी पोहोचून या अपघातातील संपूर्ण बारकावे शोधणार असल्याची माहिती आहे.
डव्वा खजरीजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात ११ जण ठार झाले. या अपघातात अति वेग आणि चालक कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पण भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातामागील नेमके कारण समजल्यास त्यावर उपाययोजना करून अपघातांना आळा घालण्यास मदत होईल. शिवाय अपघाताची जवाबदारी निश्चित करणे सुद्धा सोपे जाईल. या दृष्टीनेच परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी या अपघात प्रकरणांची विभागीय तसेच थर्ड पार्टी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आली आहे. ही संस्था घटनास्थळी पोहोचून या अपघातांमागील सर्व बारकावे तपासून त्याचा सूक्ष्म चौकशी अहवाल परिवहन आयुक्तांना सादर करणार आहे.
गोंदियाचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम तिवसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा सोमवारी (दि. २) तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत दोन सहायक मोटार वाहन निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती गठित केली आहे. या दोन्ही चौकशी समित्यांचा अहवाल तयार करण्याचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. या दोन्ही समित्यांचा अहवाल आणि थर्ड पार्टीने तयार केलेला चौकशी अहवाल एकत्रित करून परिवहन आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याचे नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मृतकांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत मिळणार शिवशाही अपघातात ११ जण ठार झाले. यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने १० लाख रुपयांची, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख रुपयांची मदत मृतकांच्या कुटुंबीयांना जाहीर केली. तर अपघातातील जखमींना सुद्धा मदत दिली जाणार आहे. सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने मृतकांचे कुटुंबीय आणि जखमींना लवकर मदत मिळावी यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांना कामाला लावले आहे.
शिवशाही बस चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनासडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील शिवशाहीच्या अपघाताची एसटी महामंडळाने सुद्धा गांभीर्याने दखल घेतली आहे. शिवशाही चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. तसेच गोंदिया आणि तिरोडा आगारातील शिवशाही गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.