लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरीजवळ शिवशाही उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा बळी गेला. २९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची आठवण येताच आजही अंगावर काटे येतात. अशात आता या घटनेला कारणीभूत बसचालक प्रणय उल्हास रायपूरकर (४२) बॅच नंबर-३१८ याला विभाग नियंत्रक अहिरकर यांनी निलंबित केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश ३० नोव्हेंबर रोजी भंडारा आगाराला देण्यात आले आहेत.
भंडारा येथून ४० प्रवासी घेऊन गोंदियाकडे धावणारी शिवशाही बस क्रमांक एमएच ०९-ईएम १२७३ सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरीजवळ २९ नोव्हेंबर रोजी उलटल्याने या अपघातात ११ जण ठार झाले. तर जखमींना सुरुवातीला डव्वा, ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे दाखल करण्यात आले होते. परंतु प्रथमोपचारानंतर त्या जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील एकूण ३८ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. यापैकी १० जणांचा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर एका रुग्णाचा उपचार सुरू असताना वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जखमी झालेल्या २७ जणांवर उपचार करण्यात आला. परंतु दुसऱ्या दिवशी ८ जण किरकोळ जखमी असल्याने ते प्रथमोपचार घेऊन घरी परतले. तर तिसऱ्या दिवशी नऊ जणांनी स्वतः रुग्णालयातून निघून घर गाठले. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ जखमींवर उपचार सुरू आहे.
आजही अंगावर काटे आणणारी ही घटना असून, वाहनचालक प्रणय रायपूरकर याच्या चुकीमुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेला घेऊन सर्वसामान्य जनतेत रोष खदखदत आहे. अशात आता या घटनेला कारणीभूत वाहन चालक प्रणय रायपूरकर विभाग नियंत्रक अहिरकर यांनी निलंबित केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश ३० नोव्हेंबर रोजी भंडारा आगाराला देण्यात आले आहेत.
चालकाला निलंबनाचा आदेश सोमवारनंतरच मिळेल विभागाला निलंबनाचे आदेश धडकले असले तरी तो आदेश तामील होण्यासाठी सोमवारपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. वाहनचालक रायपूरकर याची पोलिस कोठडी संपल्यावरच एसटी महामंडळाकडून ही कारवाई केली जाणार आहे. यामुळे वाहनचालक रायपूरकर याच्या निलंबनाचे आदेश सोमवारनंतरच मिळतील.