शिवार फेरीतून जेष्ठांचा विरंगुळा
By Admin | Updated: May 3, 2017 01:02 IST2017-05-03T01:02:22+5:302017-05-03T01:02:22+5:30
साठ वर्ष वयाचे नागरिक म्हणजे जेष्ठ नागरिक. आपआपल्या व्यवसायातून निवृत्त होण्याचे वय असा समज

शिवार फेरीतून जेष्ठांचा विरंगुळा
शेतकरी उके यांचा प्रयोग : जेष्ठांना दिली शेतीविषयक माहिती
इटखेडा : साठ वर्ष वयाचे नागरिक म्हणजे जेष्ठ नागरिक. आपआपल्या व्यवसायातून निवृत्त होण्याचे वय असा समज असला तरी अनेक जेष्ठ नागरिक कौटुंबीक व्यवसायाबरोबर विरंगुळा म्हणून अनेक कामामध्ये स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. याची अनेक उदाहरणे शहराबरोबर खेड्यातही पाहण्यास मिळतात.
इटखेडा येथील प्रयोगशील, शेतकरी, वृक्षमित्र व सिंचन व्यवस्थापनातून सेवानिवृत्त झालेले उद्यमशील नागरिक वासुदेवराव उके हे त्यापैकीच एक. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले लक्ष शेतीव्यवसाय व शेतशिवारात आंबा, फणस, केळी, ऊस लागवड याकडे केंद्रीत केले. कृषी विषयक तंत्रज्ञान,धान लागवडीसाठी बेहरोप वाटीका, कमी खर्चात धानाचे अधिक उत्पादन घेण्याचे कौशल्य, शेताच्या बांधावर केसर, दसरी, निलम, हापूस व अन्य जातीच्या आंबाच्या झाडांची लागवड, पाण्याचे व्यवस्थापन, सौर उर्जेद्वारे तारांचे कुंपन घालून शेतशिवाराची राखन इत्यादी प्रयोगाद्वारे त्यांचा पाच एकरातील शेतशिवार विलक्षण देखणा असून विरंगुळ्याचे क्षण शोधण्यासाठी एक भटकंतीचे स्थान झाल्याची जाणीव होते.
शेतशिवारात आपण करीत असलेले प्रयोग हे लोकांच्या लक्षात यावेत यासाठी त्यांनी येथील काही जेष्ठ नागरिकांना आपले शेतशिवार पाहण्यासाठी व विरंगुळा शोधण्यासाठी मुद्दाम निमंत्रित केले होते. या निमित्ताने निसर्गरम्य वातावरण आम्रवृक्षाच्या छायेत जेवणाचा बेत आयोजित केला होता. माजी पोलीस पाटील देविदान पालीवाल, सेवानिवृत्त प्राचार्य पुंडलिक धोटे, लक्ष्मण माटे, यादवराव चांदेवार, वासुदेव आदमणे, मोरेश्वर भावे, देवराम कोरडे, विजयराव मेश्राम, वासुदेव अनवले, मुखरु कल्हे, उध्दव कुंभरे इत्यादी जेष्ठ नागरिक या शिवारफेरीत सहभागी झाले होते. दरम्यान उके यांनी सहभागी अतिथींनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत प्रसन्नता फुलविली. सर्वच अतिथी शेतीव्यवसायाशी निगडीत असल्याने त्यांनी उके यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीची प्रशंसा केली. या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून काही विश्रांती व विरंगुळ्याचे क्षण शोधण्याचा आनंद घेता आला. विविध जातीच्या आंबा फळांनी लबडलेल्या आम्रवृक्षाच्या छायेत जाऊन बसण्याचा मोह होण्या इतपत हे स्थान निश्चितच निसर्गरम्य, प्रेक्षणीय व दर्शनीय आहे. (वार्ताहर)