आमगावात मतदारसंघात उत्सुकता शिगेला
By Admin | Updated: October 18, 2014 23:27 IST2014-10-18T23:27:18+5:302014-10-18T23:27:18+5:30
आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आमगावात मतदारसंघात उत्सुकता शिगेला
आमगाव : आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त केला आहे.
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र राखीव मतदारसंघ असल्याने उमेदवारांना मतदारांकडून प्रोत्साहन मिळविण्यासाठी कसरत करावी लागत होती. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांना संजीवनी मिळाली. मतदार संघात मतदानासह विजयाचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे.
या मतदार संघात तीन तालुक्यातील ३०२ मतदान केंद्रांवर ६९.६२ टक्के मतदान झाले. आठ उमेदवारांनी विजयाचे स्वप्न पाहीले आहे. परंतु मतदानानंतर सर्वांचेच गणित चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील विजयाचे दावे मागे पडू शकतात. मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विजयासाठी चुरस आहे. विजयाचे गणित बदलण्यासाठी शिवसेना, बसपा व अपक्ष यांच्या मतांना अधिक बळ आले आहे. मतमोजणीसाठी एक हजार कर्मचारी दाखल झाले आहेत. मतमोजणी १४ टेबलांवर पूर्ण होणार असून २२ फेऱ्या होणार आहेत. ही प्रक्रिया सुव्यवस्थीपणे व पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.