बिबट्याच्या पिलाने घेतला उंबराच्या झाडाचा आश्रय
By Admin | Updated: March 26, 2015 01:08 IST2015-03-26T01:08:39+5:302015-03-26T01:08:39+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचोली (जुनी) येथे तीन-चार महिन्याचा बिबट वाघाचा बछडा हेमराज परशुरामकर यांच्या घरावजळील...

बिबट्याच्या पिलाने घेतला उंबराच्या झाडाचा आश्रय
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचोली (जुनी) येथे तीन-चार महिन्याचा बिबट वाघाचा बछडा हेमराज परशुरामकर यांच्या घरावजळील औंदुबराच्या झाडावर चढला. २५ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान शौचास जाण्याऱ्या लोकांच्या दृष्टीस पडले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी वाघ पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे भितीपोटी वाघाचा बछडा झाडाला चिपकून बसला होता.
गावातील लोकांनी बिनतारी संदेशावरून गोठणगाव वनपरिक्षेत्राचे क्षेत्राधिकारी गंगावणे यांना घटनेची माहिती देण्यात आली. वनक्षेत्राधिकारी गंगावणे लगेच घटनास्थळी वनविभागाच्या चमूसह दाखल झाले.
त्यांनी औंदुबराच्या झाडावर चिपकून बसलेल्या बिबट वाघाच्या बछड्यांची पाहणी केली असता तो फार लहान असल्याने भितीमुळे झाडाला चिपकून आहे. त्या बछड्याच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही याची दखल घेत पिंजरा वगैरे मागविण्यची गरज नसून त्याला मोठ्या मेहनतीने कोणत्याही प्रकारची इजा न करता झाडाखाली उतरवून जंगलाच्या दिशेने सोडून देण्यात आले. त्याला जखम वगैरे असती तर उपचारासाठी ठेवावे लागले असते, असे वनपरिक्षेत्राधिकारी गंगावणे यांनी सांगितले.
वाघाचा बछडा रात्रीलाच गावामध्ये आला असावा आणि गावातील कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांनी झाडावर चढून आश्रय घेतल्याचा अंदाज वनक्षेत्राधिकारी गंगावणे यांनी वर्तविला आहे.
ज्या बिबट वाघांपासून हा बछडा सूटला ती वाघीन गावाशेजारीच तर नसेल या भितीने परिसरात वाघासंबधी दहशत पसरली आहे. या दहशतीची वनविभागाने दखल घेणे महत्वाचे आहे. (वार्ताहर)
वाघिणीपासून पिल्लू दुरावले
चिचोली-जुनी परिसरात बिबट्याचा छावा झाडावर दडून असल्याची बातमी पंचक्रोशीत पसरताच बघ्यांनी या गावाकडे धाव घेतली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी वडेगाव-बंध्या परिसरात कुत्र्यांनी अशाच एका छाव्याला पकडून ठार केले. या मृत छाव्याला मालकनपूर येथील नर्सरीमध्ये वनकर्मचाऱ्यांनी दहन केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. वाघीन व आणखी एका छाव्याला नवीन चिचोली, पुष्पनगर परिसरात बघितल्याचे काही लोक सांगतात. गोठणगाव-नवेगावबांध मार्गावर वाघीन व छावा दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत असल्याचे सांगितले जाते. या सर्व घटनाक्रमांवरून बिबट वाघीणीपासून दोन छावे दूरावले व एक छावा तिच्यासोबत असल्याचा तर्क लावला जात आहे.