जादुटोण्याच्या संशयातून धारदार शस्त्राने भोसकले
By Admin | Updated: September 14, 2015 01:42 IST2015-09-14T01:42:19+5:302015-09-14T01:42:19+5:30
एका ५० वर्षीय आरोपीने जादूटोणा केल्याच्या संशयावरून धापेवाडा येथील चुन्नीलाल नानोराव ठाकरे यांच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.

जादुटोण्याच्या संशयातून धारदार शस्त्राने भोसकले
गोंदिया : एका ५० वर्षीय आरोपीने जादूटोणा केल्याच्या संशयावरून धापेवाडा येथील चुन्नीलाल नानोराव ठाकरे यांच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारच्या रात्री ९.३० च्या सुमारास धापेवाडा येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, ठाकरे व त्यांची पत्नी बिजनबाई चुन्नीलाल ठाकरे हे दाम्पत्य गावातील लोकांसह या प्रकरणातील आरोपीला समजावण्यासाठी त्याच्या घरासमोर गेले होते. यावर आरोपीने बिजनबाईला तू माझी बदनामी का करतेस, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. यावर तू माझ्या पत्नीला शिवीगाळ का करतोस, असे म्हणून चुन्नीलाल त्याच्यासमोर गेले असता आरोपीने त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला.
जितेंद्र तिलकचंद ठाकरे यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ५०४ अन्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)