शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श - सूर्यवंशी

By Admin | Updated: June 28, 2015 01:13 IST2015-06-28T01:13:18+5:302015-06-28T01:13:18+5:30

समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले.

Shahu Maharaj Model for Social Justice - Suryavanshi | शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श - सूर्यवंशी

शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श - सूर्यवंशी

गोंदिया : समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले. त्यांच्या कल्याणासाठी महाराजांनी प्रसंगी संघर्षही केला. समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिने शाहू महाराज हे आदर्श आहे, असे विचार जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
येथील सामाजिक न्याय भवनात शुक्रवारी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जयवंत पाडवी, दलितमित्र डॉ. जे.डी. राऊत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुयर्वंशी यांनी, त्या काळी विषमतेचे वातावरण असताना सामाजिक न्यायाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. ती त्यांनी प्रत्यक्षात देखील आणली. शासन आज सामाजिक न्यायाचे अनेक उपक्रम व योजना राबवित आहे. याचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. वंचित व उपेक्षीत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला लाभ देण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
गाडवे यांनी, शाहू महाराजांनी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. आरक्षणाची सुरुवात देखील महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराजांचा आदर्श पुढे ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगीतले.
पाडवी यांनी, अस्पृष्यतेचे निवारण करुन मागास घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांमुळेच मागासवर्गीय घटकांचे कल्याण होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राजीव गांधी समाजकार्य माहविद्यालयाचे विद्यार्थ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी मांडले. आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Shahu Maharaj Model for Social Justice - Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.