गोंदिया: जन्मतः मुकी व विधवा असलेल्या ३९ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी देवा उर्फ देवीदास इस्कापे (रा. नवेगावबांध) याला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी २ ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी केली आहे. या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेने दुर्बल, अपंग महिलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
१४ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९ वाजता पीडित महिला आपल्या घरी लहान मुलांसह राहत होती. टीव्ही पाहत असताना आरोपी भोजराज टेंभुर्णे व देवा इस्कापे यांनी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. खोट्या आमिषाने फसविण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यानंतर भोजराजने तिच्यावर अत्याचार केला. तर इसकापेने तिचे हात-पाय पकडून ठेवले. या घटनेला पीडितेचा मुलगा साक्षीदार ठरला. पिडीतेचा लहान मुलगा याने घटनेचा विरोध केला असता, त्याच्या गालावर थापड मारून त्याला आरोपींनी बाहेर पळवून लावले होते. यावरून पिडीतेच्या लहान मुलाने त्याचा मोठा भाऊ व काकांच्या मुलांना घटनेची माहिती दिली. पिडीतेच्या मुलाने दोन्ही आरोपीविरूध्द १५ सप्टेंबर २०१८ रोजी नवेगावबांध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नवेगांवबांध पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविचे कलम ३७६ (२) (एल), ३७६ (ड), १०९, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रतापसिंह शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी तपास केला होता. दोन्ही आरोपीचा सामायिक इरादा हा पिडीतेवर सामुहिक अत्याचार करण्याचा होता. म्हणून, सहआरोपीचे कृत्य हे भादंविचे कलम ३७६ (ड) प्रमाणे दोन्ही आरोपींनी केले असे मानले जाते. या प्रकरणात पिडीतेची बाजू सहायक सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी मांडली.
निकाला पूर्वीच एका आरोपीचा मृत्यू
प्रकरणात भोजराज टेंभुर्णे याचा मृत्यू न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान झाला. मात्र न्यायालयाने दोघांचाही सामूहिक बलात्कार करण्याचा सामायिक इरादा असल्याचे नमूद करून, इस्कापे याला दोषी धरले. मुख्य आरोपी मरण पावला तरी सहआरोपीस त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल दोषी धरता येते, असे न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून ऐतिहासिक निर्णय आरोपीविरूध्द दिला आहे.