गंभीर रूग्ण झोपतात जमिनीवर
By Admin | Updated: February 23, 2015 02:07 IST2015-02-23T02:03:00+5:302015-02-23T02:07:35+5:30
जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून ...

गंभीर रूग्ण झोपतात जमिनीवर
लोकमत विशेष
गोंदिया : जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून उपचार करून वेळीच घरी जा असे सांगितले जाते. तर काहींना खालीच झोपावे लागत आहे.
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र या रूग्णालयात २०० खाटांची सोय नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोकांना उपचार केल्यानंतर लगेच उपचार करून घरी पाठविण्यात येते. काहींना खाटा दिल्या जात नसल्यामुळे त्यांना खालीच जागा मिळेल तिथे झोपावे लागते. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शनिवारी हा प्रकार प्रकर्षाने जाणवला.
कुडवा येथील सौरभ अनिल वडीचार (१५) याला आपल्या पायाचे प्लास्टर काढून दुसरे प्लास्टर लावायचे होते. त्यासाठी तो रूग्णालयात आला होता. मात्र त्याला खाट न दिल्यामुळे त्याला त्याच्या आईवडीलांनी आपल्या खुर्चीवरच झोपवून आपल्या मांडीचा आधार दिला. कुडवा येथील संतोष दलीराम गजभिये (४९) यांनाही झोपायला खाट नसल्यामुळे ते तासनतास स्ट्रेचरवरच पडून होते. गराडा येथील वामन दयाराम बावनकर (४०) यांच्या पायाचे प्लास्टर करण्यात आले. परंतु त्यांनाही खाट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तासनतास रूग्णालयातील खुर्चीवर बसून राहावे लागले.
गराडा येथील बाळकृष्ण बाबूराव बावनकर (४५) हे अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात १५ दिवस तरी दाखल करणे गरजेचे असतांना त्यांच्या पायाला प्लास्टर करून त्यांना डॉक्टरांनी घरी जाण्यास सांगितले. प्लास्टर झाले परंतु पायाची हालचाल करता येत नसतानाही त्या रूग्णांना तिथून घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
रूग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून त्यांना तेथून घरी जाण्याचा सल्ला दिला जातो. यावर त्या रूग्णांनीे चक्क रूग्णालयाच्या प्रवेश दारावर असलेल्या वऱ्हांड्यालाच आपले आराम करण्याचे स्थान बनविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांनाही केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात खाटा दिल्या जात नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याची रूग्णांची तक्रार वाढतच चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अनेक रूग्ण रेफर टू नागपूर
एकमेव शासकीय जिल्हा सामान्य रूग्णालय असल्यामुळे गरिब रूग्ण या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतात. परंतु अनेक रूग्णांना गंभीर असल्याचे सांगून नागपूरला रेफर केले जाते. अपघातातील जखमी असोत किंवा जळालेले रूग्ण असोत त्यांना रेफर टू नागपूर केले जाते.
रूग्णांची पिळवणूक
गरिब रूग्ण उपचार घेण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात आल्यास त्यांना त्यांचा आजार गंभीर असल्याचे सांगून खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविले जाते. काही डॉक्टर स्वत:च्या खासगी रूग्णालयात, तर काही दुसऱ्या खासगी डॉक्टरांकडे अनेक रूग्णांना रेफर करतात. काही डॉक्टरांचे खासगी रूग्णालयाशी साटेलोटे असल्यामुळे त्यांना कमीशन देण्यात येत असल्याचे बोलले जाते. गरिब रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.