गोंदियात होणार व्हाईट आर्मीची स्थापना
By Admin | Updated: July 26, 2015 01:55 IST2015-07-26T01:55:33+5:302015-07-26T01:55:33+5:30
जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी ...

गोंदियात होणार व्हाईट आर्मीची स्थापना
गोंदिया : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी या नावाचे युवकांचे संघटन करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास ही युवकांची प्रशिक्षित, शिस्तबद्ध फौज तत्काळ त्या ठिकाणी धाव घेवून मदत करेल. यासाठी शहरातील व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शुक्रवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
सभेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, गोंदिया नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी राणे, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे संस्थापक अध्यक्ष निर्मल अग्रवाल, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे सचिव अपूर्व अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदियाचे कालूराम अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदिया संजीवनीचे सचिव राजेश कनोजिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, २३ जुलै रोजी रात्री ८.०६ मिनिटांनी आलेल्या भूकंपाची तिव्रता ३.९ रिस्टर स्केल इतकी होती. परंतु आता पुन्हा भूकंपाचे धक्के येण्याची शक्यता नसल्याची माहिती जबलपूर व हैद्राबाद येथील संस्थेच्या वैज्ञानिककांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असता दिली. जमिनीत असलेल्या भेगांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचे पाणी जात असल्यामुळे क्वचीत प्रसंगी असे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. जिल्ह्यातच या भुकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत १० कि.मी. खोलवरील अंतरावर असल्याची माहिती त्यांना वैज्ञानिकांकडून मिळाली. जिल्ह्यात भूकंपाच्या धक्यामुळे कोणत्याही तालुक्यात जिवित व वित्तहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदारांकडून प्राप्त झाली असून प्रत्येक व्यक्तीने सतर्कतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील ८७ गावे नदिकाठांवर आहे असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही गावे पुराने बाधित होणार नाही. यासाठी यंत्रणा व ग्रामस्थांनी समन्वयातून काम करावे. गावातील पाणी पुरवठा योजना पुराने बाधित झाल्यास संबंधित ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुरेसा औषधसाठा व सुसज्ज रुग्णवाहिका रुग्णालयामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळण्यास मदत होईल. नाव व होड्या पूर परिस्थितीच्या काळात सुस्थितीत असल्या पाहिजेत असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात लॉयन्स क्लब, जेसीस क्लब, रोटरी क्लब, रेड क्रॉस यासह अन्य सेवाभावी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार उद्भवणार नाही. यासाठी गावपातयीवर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू असावेत. धरणातून पाणी सोडण्यात पूर्वी बाधित होणाऱ्या नदीकाठच्या गावांना पूर्वसूचना द्यावी असे त्यांनी सूचविले. (जिल्हा प्रतिनिधी)