सर्व्हिस रोड देत आहे अपघाताला आमंत्रण
By Admin | Updated: November 15, 2014 22:50 IST2014-11-15T22:50:27+5:302014-11-15T22:50:27+5:30
शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष

सर्व्हिस रोड देत आहे अपघाताला आमंत्रण
देवरी : शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष असल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.
सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाच्या वेळी सात मीटरचा सर्वीस रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आला. सर्वीस रोड निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच हा मार्ग अतिक्रमणाने व्याप्त असल्याने या मार्गावरून चारचाकी वाहन नेण्यास चालकांना खूप त्रास घ्यावा लागतो. तसेच अशोक कंपनीद्वारे महामार्गावरील पाणी नाली मध्ये जाण्याकरिता जागोजागी हा मार्ग खोदून ठेवण्यात आलेला आहे. परंतू त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांचा नेहमी अपघात होत असतो.
बसस्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडवर काही फुटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर बऱ्याच ठिकाणी दिवसभर वाहनं उभी राहत असल्याने सर्वीस रोडची रूंदी कमी झाली असून दुचाकी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. कित्येक ठिकाणी या रस्त्याला लागून कचऱ्याचे ढीग लागले आहेत. कंपनी कडे या मार्गाच्या देखभालीकरिता २० वर्षाचा करार करण्यात आला आहे. परंतू कंपनीचे अधिकारी म्हणतात की हे आमचे काम नसून ग्राम पंचायतची जबाबदारी आहे. मागील दोन वर्षांपूर्वी मोठमोठी दुकाने तोडून अतिक्रमण हटविण्यात आले व सर्वीस रोड तयार करण्यात आले. परंतू अद्याप या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यात आले नाही. ग्रामवासीयांनी यापुर्वी सुद्धा सर्वीस रोडवरील समस्या दूर करण्याची मागणी केली होती. पण याकडे दुर्लक्षच करण्यात आले. यावर मात्र देवरीवासीयांनी अशोका बिल्डकॉम कंपनी व प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)