सेवायोजन कार्यालय ठरलेय कुचकामी
By Admin | Updated: July 17, 2015 01:18 IST2015-07-17T01:18:55+5:302015-07-17T01:18:55+5:30
जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर चार-पाच महिने कुठलेही काम शिल्लक नसते.

सेवायोजन कार्यालय ठरलेय कुचकामी
सोनपुरी : जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर चार-पाच महिने कुठलेही काम शिल्लक नसते. त्यामुळे मजुरीच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागते. हीच अवस्था जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारीची झाली आहे. सेवायोजन कार्यालय देखील नावापुरतेच झाले आहे. सालेकसा तालुक्यात एखादा मोठा उद्योग स्थापन झाल्यास अनेक बेरोजगारांना काम मिळण्याची शक्यता आहे. मात्र येथील बेरोजगार युवक मोठ्या उद्योगाच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यात बेरोजगारांची स्थिती फारच बिकट आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारीचे सावट आहे. या तालुक्याच्या सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी एक तरी मोठा उद्योग किंवा प्रकल्प तालुक्यात सुरू करण्यात यावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासूनची आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची नोंदणी करण्यासाठी सेवायोजन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र नोंदणी करून ही २० ते २७ वर्षामध्ये एखाद्या बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे हे कार्यालय कुचकामी ठरत आहे. नाव नोंदणी व नूतनीकरण आॅनलाईन करण्यात आले असले तरी अद्याप संगणकावर रोजगार संबधी जाहिरात पण दिसत नाही. गोंदिया येथील सेवायोजन कार्यालय येथे संपर्क केला असता येथे बेरोजगारासाठी मार्गदर्शन केंद्र नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसमोर रोजगार मिळविण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकंदर जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरत आहे. (वार्ताहर)