विनयभंगाचा दोषारोप २४ तासांत पाठवा

By Admin | Updated: December 14, 2015 02:14 IST2015-12-14T02:14:07+5:302015-12-14T02:14:07+5:30

महिलांच्या विनयभंगाची प्रकरणे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु या प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात पाठवितांना उशीर होत असल्याने आरोपी मोकाट सुटतात.

Send blasphemy allegations in 24 hours | विनयभंगाचा दोषारोप २४ तासांत पाठवा

विनयभंगाचा दोषारोप २४ तासांत पाठवा

पोलीस महासंचालकाची आढावा बैठक: पोलिसांना दिले तत्परतेचे आदेश
गोंदिया : महिलांच्या विनयभंगाची प्रकरणे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु या प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात पाठवितांना उशीर होत असल्याने आरोपी मोकाट सुटतात. साक्षीदारही बदलतात व सर्व खापर पोलिसांवर फोडले जाते. विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी अशा प्रकरणांचा दोषारोप घटनेच्या २४ तासांच्या आत न्यायालयात सादर करा त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आले असताना शनिवार व रविवार दोन दिवस गोंदिया जिल्ह्यात घालवून त्यांनी आढावा बैठक घेतली. सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी गोंदिया जिल्ह्यासंदर्भात महत्वपुर्ण सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांनी, सायबर क्राईम करण्यात विद्यार्थी वर्ग पुढे येत आहे त्यासाठी शाळा- महाविद्यालयात सायबर क्राईम संदर्भात मेळावे घेऊन त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून द्या, एससी-एसटींचे मेळावे घ्या व त्यात त्यांच्या समस्या जाणून घ्या, महिला बचत गटांची बैठक घ्या, गावागावात पोलीसमित्र तयार करा, पेट्रोलिंग घालताना त्यांची मदत घ्या, महिला अत्याचार, लहान मुले व जेष्ठांच्या समस्या वाढल्या असून त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, महिलांची तक्रार नोंदवितांना आॅन कॅमेरा त्यांचे बयाण नोंदवावे, घटनास्थळाचे पंचनामे करताना व्हीडीओ शुटींग करा, प्रत्येक गुन्ह्याचा जलदगतीने तपास करा, पोलिसांच्या कामात पारदर्शता यावी यासाठी एफआयआर त्वरीत तक्रारकर्त्यास व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह च्या आरोपींवर कडक कारवाई करा, पोलिस विभागात व्यसनी असलेल्या पोलिसांना व्यसनमुक्त करण्यासाठी कार्यशाळा घ्या, पोलिसांच्या अपंग मुलांना मदत करा, पोलिसांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहन द्या अशा विविध सूचना दिल्या. या बैठकीत पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड, तिरोडाचे देवीदास ईलमकर, आमगावच्या दीपाली खन्ना, एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, नक्षल विरोधी अभियानचे पोलीस निरीक्षक संजीव गावडे व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

गोठणगावात ऐकल्या जवानांच्या समस्या
रविवारी गोठणगाव येथे पोलीस जवानांची सभा घेऊन त्यांच्या समस्या दिक्षीत यांनी जाणून घेतल्या. सोबतच नक्षलवाद्यांचा नायनाट कसा करता येईल यासंदर्भात काही टिप्स त्यांनी दिल्या. नक्षलवाद्यांशी लढा देताना काय अडचणी आहेत ते जाणून त्यावर त्वरीत उपाय सूचविले. कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सर्व समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Send blasphemy allegations in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.