स्वयंरोजगाराकडे वाढला कल
By Admin | Updated: May 20, 2016 01:30 IST2016-05-20T01:30:41+5:302016-05-20T01:30:41+5:30
एकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता...

स्वयंरोजगाराकडे वाढला कल
९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद : सुक्ष्म व्यवसायांची संख्या अधिक
कपिल केकत गोंदिया
एकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराची कास धरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा उद्योग केंद्राकडे या ९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद झाल्याचे दिसते. नोकरीची प्रतीक्षा सोडून युवक स्वत:च काहीतरी करून दाखविण्याची धडपड करीत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही शासकीय नोकरी सहजासहजी मिळत नाही, ही आजची वास्तविकता आहे. नोकरीसाठी धडपड व मेहनत करताना वयोमर्यादा निघून जाते व नोकरीसाठीची आशा शेवटी निराशेत बदलून युवा वर्ग रोजीरोटीसाठी लहानसहान रोजगाराकडे वळतात. युवकांना पूर्वीपासूनच नोकरीची आस न बाळगता व कुणाची नोकरी न करता स्वत:साठी स्वत:चे काही करून दाखविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र एक मार्गदर्शक ठरत आहे.
स्वयंरोजगाराकडे वळून स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून मार्गदर्शनही दिले जाते असून हेच केंद्राचे मुख्य उद्दीष्ट आहे. सध्या दोन महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी उद्योग केंद्र कर्जस्वरूपातून भांडवल उपलब्ध करवून देत आहे. त्यामुळे बेरोजगारांना मार्गदर्शनासह भांडवलाचीही व्यवस्था केंद्राच्या माध्यमातून होत आहे. परिणामी जिल्ह्यातील युवा वर्ग नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराकडे वळत असल्याचे दिसत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ४७२ उद्योगांची नोंद झाल्याची आकडेवारी मिळाली आहे.
या ४७२ उद्योगांत ४३४ सूक्ष्म (मायक्रो) उद्योग असून ते ० ते २५ लाख क्षमतेत येतात. त्यानंतर ३८ उद्योग लहान (स्मॉल) उद्योग असून २५ लाख ते ५ कोटीपर्यंत येते. विशेष म्हणजे यातील एकही मध्यम (मिडीयम) उद्योग नाही. कारण त्याची क्षमता ५ ते १० कोटींच्या घरात असते.
आता आॅनलाईन रजिस्ट्रेशन
पूर्वी उद्योगांची नोंदणी करण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्राकडून पार्ट-१ (अस्थायी) व उद्योग सुरू झाल्यानंतर पार्ट-२ (स्थायी) असे दोन प्रमाणपत्र दिले जात होते. मात्र सप्टेंबर २०१५ पासून ही प्रक्रिया आता आॅनलाईन झाली असून केंद्राच्या संकेतस्थळावरूनच आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. यामुळे उद्योग केंद्रासह अर्जदारांनाही हे सोयीचे ठरत आहे.
रोजगार निर्मिती कार्यक्रमापासून निराशा
बेरोजगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम एक महत्वाची योजना मानली जाते. महत्वाची बाब म्हणजे, याअंतर्गत जिल्ह्याला सन २०१५-१६ करिता काहीच टार्गेट देण्यात आले नव्हते. अर्थात ही योजना या वर्षात बंद होती. मात्र चालू वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला या योजनेंतर्गत टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे.