४६० विषय शिक्षकांची निवड

By Admin | Updated: June 1, 2016 02:25 IST2016-06-01T02:25:54+5:302016-06-01T02:25:54+5:30

जि.प. शाळांमध्ये विषय शिक्षक देण्यासाठी २३ व २४ मे रोजी जि.प.च्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

Selection of 460 Subject Teachers | ४६० विषय शिक्षकांची निवड

४६० विषय शिक्षकांची निवड

शिक्षक पदस्थापना : ३०० शिक्षकांच्या ३ जून रोजी सर्वसाधारण बदल्या
गोंदिया : जि.प. शाळांमध्ये विषय शिक्षक देण्यासाठी २३ व २४ मे रोजी जि.प.च्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सेवाज्येष्ठतेनुसार असलेल्या १०२३ शिक्षकांना बोलावण्यात आले होते. त्यातील ४६० शिक्षकांची विषय शिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना संबधित शाळांत नियुक्ती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक शाळांमध्ये अनेक विषयांचे शिक्षक नव्हते. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक होते. मागील पाच वर्षापासून एकीकडे विषय शिक्षक नाही ही ओरड तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक मोठ्या प्रमाणात असल्याची ओरड होती. त्यामुळे ज्या-ज्या शाळेत विषयांचे शिक्षक रिक्त आहेत, त्या-त्या शाळेत संबंधित विषयाच्या डीएड्, बीएड् व पदवीधर शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात ४९० अतिरिक्त शिक्षक होते. त्यापैकी ४६० शिक्षकांचे विषय शिक्षक म्हणून समायोजन करण्यात आले. तरी देखील ३० शिक्षक आजही अतिरिक्त आहेत.
२६ व २७ मे रोजी तालुकास्तरावर समायोजन करण्यात आले. २८ तारखेला ३३ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी शिक्षकांना पाठविण्यात आले. संच मान्यतेमुळे हे शिक्षक अडचणीत येणार होते. परंतु आता विषय शिक्षक म्हणून समायोजन झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा या शिक्षकांना वेतनाची समस्या पुढे भेडसावली असती. गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत ९५ टक्के शिक्षकांच्या समस्या या समायोजनामुळे संपल्या. ५ टक्के समस्या दिवाळीपर्यंत संपणार आहेत.
मागील पाच वर्षात शिक्षकांची बदली नाही, समायोजन नाही, रिक्त पदांची भरती नाही, त्यामुळे कामात मोठ्या अडचणी येत होत्या. परंतु आता जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्या पुढाकाराने व मुकाअ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही कार्यवाही पूर्ण केली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Selection of 460 Subject Teachers