माणसाला माणूस म्हणून बघा
By Admin | Updated: February 27, 2015 00:44 IST2015-02-27T00:44:27+5:302015-02-27T00:44:27+5:30
अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याकरिता कुटुंबामध्ये आई-वडिलांकडून बालकांवर केले जाणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

माणसाला माणूस म्हणून बघा
गोंदिया : अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याकरिता कुटुंबामध्ये आई-वडिलांकडून बालकांवर केले जाणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांना जाती-पातीचे शिक्षण देवूच नये. त्यामुळे येणारी पिढी जातीबद्दल भेदभाव करूच शकणार नाही. कायद्याच्या भीतीने समाजामध्ये समानता निर्माण होत नसते तर त्याकरिता माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांमध्ये रुजविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
बुधवार (दि.२५) सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या (बार्टी) वतीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अट्रासिटी कायदा) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या वेळी डॉ. सैनी बोलत होते.
कार्यशाळेला सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख तथा प्रसिध्द विचारवंत हरी नरके, विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष एस.जी. गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, समाजकल्याण उपायुक्त दिलीप राठोड, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रवीण अडगे, अॅड. बीणा वाजपेयी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तथा कार्यशाळा समन्वयक मनोज खंडारे, बार्टीचे निबंधक तथा प्रकल्प संचालक राजेंद्र मुठे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. अमित सैनी यांनी जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीतीत दाखल प्रकरणांबाबत निर्णय घेतांना येणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष चर्चा केली. विविध प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करीत असताना वैद्यकीय तपासणीमुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. तसेच वैद्यकीय तपासणीस नकार दिल्यामुळे समितीला कठोर निर्णय घेणे बंधनकारक ठरते. याबाबत जागृती करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे व पाठपुरावा कसा करावा याबाबतच्या अपूर्ण माहितीमुळे कायद्यांतर्गत मिळणारा लाभ पीडित नागरिकांना मिळत नाही. तेव्हा याबाबत संभ्रम असू नये, असेही ते म्हणाले. प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.
कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभाग प्रमुख हरी नरके यांनी महाराष्ट्रातील जातीप्रथा, समस्या आणि सामाजिक वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. विनोदकुमार गजभिये यांनी कायद्यातील तरतुदी, विश्लेषण, मानवी हक्क अंमलबजावणी व प्रशासनाची भूमिका याबाबत माहिती दिली. अॅड. राजेंद्र पांडे यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक दिलीप राठोड यांनी, संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी तर आभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी मानले.
कार्यशाळेला पोलीस अधिकारी, तहसीलदार, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)