बिरसी येथील सुरक्षा रक्षकांचे आंदोलन सुरूच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:51+5:302021-02-05T07:49:51+5:30
गोंदिया : सतत १३ वर्षे काम करूनही बिरसी विमानतळ प्रशासनाने कोणतेही कारण नसताना कामावरून काढल्यामुळे येथील सुरक्षा रक्षकांनी दिनांक ...

बिरसी येथील सुरक्षा रक्षकांचे आंदोलन सुरूच ()
गोंदिया : सतत १३ वर्षे काम करूनही बिरसी विमानतळ प्रशासनाने कोणतेही कारण नसताना कामावरून काढल्यामुळे येथील सुरक्षा रक्षकांनी दिनांक १९ जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान आपल्या आंदोलनाची जिल्हा व विमानतळ प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आंदोलनकर्त्यांनी प्रजासत्ताकदिनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत उपवास आंदोलन केले. दिवसभर उपवास करूनही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांत प्रशासनाविरुद्ध रोष आहे.
बिरसी परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध १९ जानेवारीपासून विमानतळाच्या गेटसमोर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात महिलांसोबतच त्यांची लहान-लहान मुलेदेखील सहभागी झालेली आहेत. प्रजासत्ताकदिनी आंदोलनकर्त्यांनी आपल्या लहान मुलांनादेखील उपाशी ठेवले, हे विशेष. दरम्यान माजी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा मजदूर संघाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कामठा येथील सर्व पदाधिकारी, कामठाचे जमीनदार पृथ्वीसिंग नागपुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्रजासत्ताकदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख हे जिल्ह्यात असूनही त्यांनी या आंदोलनाची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे बिरसी परिसरातील स्थानिक नागरिकांत रोष आहे. एवढेच नव्हे तर हे आंदोलन सुरू होऊन तब्बल १० दिवसांचा काळ लोटला तरी जिल्ह्याचे खासदार, विमानतळ व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली. त्यांच्या भूमिकेवरही स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे की विमानतळाच्या हिताचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थितीत केला आहे. या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे.