डिजिटल शाळांत गोंदिया राज्यात द्वितीय
By Admin | Updated: April 23, 2017 01:43 IST2017-04-23T01:43:45+5:302017-04-23T01:43:45+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल

डिजिटल शाळांत गोंदिया राज्यात द्वितीय
१ मे रोजी जाहीर करणार
नरेश रहिले गोंदिया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. जिल्ह्यातील केवळ चार शाळा सोडल्यास उर्वरित सर्व जिल्हा परिषद शाळा शासनाच्या अनुदानातून नाही तर लोकसहभागातून डिजीटल करण्यात आल्या आहेत. १०६९ शाळांपैकी १०६५ शाळा आतापर्यंत डिजीटल झाल्या असून २६ एप्रिल रोजी सर्व शाळा डिजीटल होणार आहेत. त्यामुळे १ मे रोजी राज्यातील दुसरा डिजीटल जिल्हा म्हणून गोंदियाला ओळख मिळणार आहे.
विज्ञान युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी हवे तसेच त्यांना एका क्लिकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी शासनाने डिजीटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. या डिजीटल शाळांसाठी अनुदान न देता समाजातील लोकांना भावनिक आवाहन करून त्यांच्या खिशातील पैश्यातून आपापल्या गावातील शाळा डिजीटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. या जबाबदारीला पेलवत जिल्ह्यातील १०६५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न सरकारने पाहिले. यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी), पीएसआर (पब्लिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अशा विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले. जिल्ह्यातील ३० शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासंदर्भातील व्हिडीओ दाखविण्याचेही काम केले जात
आहे.
२४ शाळा होत्या अडसर
जिल्हा डिजिटल करण्यासाठी १७ एप्रिल रोजी २४ शाळा अडसर होत्या. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्या २४ शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून काय समस्या आहे याची विचारणा केली. दोन दिवसात म्हणजेच १९ एप्रिलपर्यंत समस्या कळवा असे सांगण्यात आले. त्या समस्यांवर तोडगा काढून त्या शाळा डिजीटल करण्याचा मार्ग सुकर केला. त्यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ शाळा, गोंदिया तालुक्यातील ४ शाळा आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६ शाळा अश्या २४ शाळा डिजीटल करण्यात सर्व यंत्रणा कामावर लागली. आता फक्त ४ शाळा शिल्लक असून त्याही २६ जूनच्या आत डिजीटल होणार आहेत. या शाळांनी डिजीटल करण्यासाठी साहित्य खरेदी केले, परंतु ते बसविण्यात आलेले नाही.
शासनाचा निधी नाही
शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचा निधी मिळाला नाही. जि.प. शाळातील विद्यार्थ्यांना आपापल्या गावातील लोकांना भावनिक आवाहन करून तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटल करायची आहे, त्यासाठी मदत करा असे आवाहन केले. त्या आवाहनातून लोकांनी कोट्यवधीच्या घरात पैसे जमा केले. परिणामी जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजिटल होण्यास सुरूवात झाली.