सिमेंट बंधाऱ्यांसाठी जागा अयोग्य

By Admin | Updated: June 13, 2015 00:56 IST2015-06-13T00:56:38+5:302015-06-13T00:56:38+5:30

जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर ..

The seats are not suitable for cement bundles | सिमेंट बंधाऱ्यांसाठी जागा अयोग्य

सिमेंट बंधाऱ्यांसाठी जागा अयोग्य

शेतकऱ्यांची ओरड व तक्रारी : कंत्राटदार व अधिकाऱ्यांची लाभासाठी धावपळ
काचेवानी : जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करण्यात येत आहेत. मात्र बहुतेक ठिकाणी अयोग्य जागेची निवड करण्यात आल्याने ते निरर्थक ठरणार आहेत. अंदाजपत्रकानुसार कामे होणार नसून लाखो रूपयांच्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार व निर्देशित अधिकाऱ्यांची स्थिती ‘सोने पे सुहागा’ होणार असल्याचे दिसत आहे.
काचेवानी, बरबसपुरा गावांसह विविध ठिकाणी नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. बरबसपुरा सीमेत सिमेंट नाला बनत आहे. त्या बांधकामात अंदाजपत्रकानुसार गिट्टीचा वापर न करता निकृष्ट दर्जाच्या गिट्टीचा वापर करण्यात येत होते. त्यामुळे लघू सिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) गोंदियाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी हे काम तोडून दुसऱ्यांदा तयार करण्याचे आदेश दिले होते.
काही लोकांनी तक्रारी केल्याने अधिकाऱ्यांनी काम थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र कंत्राटदार व सहायक अभियंता यांनी साटेलोटे करून माल कमाओ अभियान सुरू केल्याने अशा तक्रारी दडपल्या जात आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नसते तर कंत्राटदार व नियंत्रक अभियंता यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून निधी दडपला असता.
नाल्यावर बंधारे तयार करताना दोन बंधाऱ्यातील अंतर ५०० ते ८०० मीटर दरम्यान असणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदार व संबंधित नियंत्रक विभागप्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अंदाजपत्रकात दर्शविलेल्या ठिकाणी बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र अनेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहेत.
जल शिवारांतर्गत शासनाने पाठविलेला निधी कसातरी खर्च व्हावा, अशी धारणा कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना किती प्रमाणात होणार की नाही, हे पाहण्याची गरज त्यांना वाटत नाही, असे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले. बंधाऱ्याची पाळ तयार करताना जास्तीत जास्त लागणाऱ्या साहित्याची बचत कशी होईल व यातून अधिकाधिक लाभांश कसा मिळविता येईल, अशी योजना कंत्राटदार व अधिकारी तयार करीत आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात येणारे बंधारे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे काय? याची चौकशी करून बांधकाम करण्यात यावे. तसेच याकडे संबंधित गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
बरबसपुरा व काचेवानी येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी
बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करताना आणि जागांची निवड करताना त्या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे बरबसपुरा नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करताना शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली. तसेच लघू सिंचन विभाग व कृषी विभागाला तक्रारी सादर करण्यात आल्या. बरबसपुरा येथील लिचडे कुटुंबीयांनी तक्रार करून आक्षेप नोंदविला आहे. काचेवानी शिवारातील नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून मोतीलाल पटले व इतर शेतकऱ्यांनी तक्रारी सादर केल्या आहेत. तसेच बंधाऱ्याची जागा योग्य नसल्याने नुकसान आपल्या शेतातील पिकांना होईल, असे त्यांनी सांगितले. असे प्रकार सर्वच ठिकाणी दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: The seats are not suitable for cement bundles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.