धान खरेदी केंद्राला सील
By Admin | Updated: February 28, 2015 01:00 IST2015-02-28T01:00:55+5:302015-02-28T01:00:55+5:30
बोगस सातबाराच्या आधारावर धान खरेदी करीत असल्याची तक्रार मिळाल्यामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेतील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तहसीलदार गेले असता ...

धान खरेदी केंद्राला सील
सालेकसा: बोगस सातबाराच्या आधारावर धान खरेदी करीत असल्याची तक्रार मिळाल्यामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेतील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तहसीलदार गेले असता संबंधित कार्यालयात अध्यक्ष व सचिव गैरहजर असल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर ते संस्थेचे कागदपत्र घेऊन बेपत्ता झाल्याचे माहित झाल्यावर तहसीलदार सुनील सुर्यवंशी यांनी धान खरेदी केंद्राच्या कार्यालयाला तसेच गोडाऊनला शुक्रवारी सील ठोकले. पुढील कारवाई करण्यासाठी वरिष्ठाकडे माहिती सादर केली.
सविस्तर वृत्त असे की, सेवा सहकारी संस्थेचे संचालक उमेदलाल जैतवार आणि गोविंद वरखडे यांनी तहसीलदार आणि इतर संबंधीत विभागाकडे तक्रार सादर केली होती. त्यात सालेकसा र.न. १०४२ मध्ये शेतकऱ्याच्या धान खरेदीबाबत सातबारामधील माहिती चुकीची असून याची चौकशी करावी अशी मागणी केली. वास्तविक आता शेतकऱ्यांनी धान विक्री बंद केली आहे. परंतु त्यांच्या नावाचा सातबारा वापरून व्यापाऱ्याचे धान खरेदी केली जात आहेत. एवढेच नाही तर मुळ सातबारावर खोडतोड करून त्यावर जमिनीचे प्रमाण वाढवून धान अधिक प्रमाणावर विक्री व्हावे अशाप्रकारे गैरमार्गाचा अवलंब केला जात होता. इतरही गैरप्रकार करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे तहसीलदाराने या संस्थेची चौकशी करणे अनिवार्य समजले व शेवटी संस्थेला सीलबंद केले. (प्रतिनिधी)