हाजराफॉलला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या स्कूटीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 00:06 IST2016-08-04T00:06:29+5:302016-08-04T00:06:29+5:30
गोंदियातील विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनींची स्कूटर पानगाव वळणावर अनियंत्रित होऊन दगडावर आदळल्यामुळे दोघी जखमी झाल्या.

हाजराफॉलला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या स्कूटीला अपघात
दोघी जखमी : पानगाव वळणावर दगडावर आदळली
सालेकसा : गोंदियातील विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनींची स्कूटर पानगाव वळणावर अनियंत्रित होऊन दगडावर आदळल्यामुळे दोघी जखमी झाल्या. त्यापैकी एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. श्रृतिका प्रमोद गुप्ता (१५) रा.अशोक कॉलनी गोंदिया असे गंभीर जखमीचे नाव असून दर्शिका हरिश पुजारा ही किरकोळ जखमी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या दोघींसह आणखी दोन विद्यार्थिनी व चार विद्यार्थी असे आठ वर्गमित्र-मैत्रिणी हाजराफॉलचा धबधबा पाहण्यासाठी सकाळी चार गाड्यांनी निघाले होते. त्यापैकी श्रृतिका व दर्शिका या दोघी एका स्कुटीवर होत्या. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान पानगाव-सालेकसादरम्यान तलावानजीक वळणाला स्कुटीवरील ताबा सुटला व अपघात घडला व रस्त्यालगतच्या दगडावर आदळून स्कुटीचे मधातून दोन तुकडे झाले.
त्या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अनोळखी असल्याने ते कोणाला मदत मागण्यासाठी घाबरत होते. एवढ्यात दर्रेकसा येथील रहिवासी असलेले प्रा.मंगेश ठाकरे कॉलेजला जात असताना त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी जखमी श्रृतिकाला उचलून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे नेले. तिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर १०८ क्रमांकावर अॅम्बुलेन्स बोलावून गोंदियाला रेफर करण्यात आले. त्यांच्यासोबत शुभांशू राकेश आंबेडकर, आकांक्षा राकेश चौरसिया व इतर चार असे एकूण आठ विद्यार्थी होते. आई-वडिलांना न सांगताच ते शाळेच्या गणवेशावर हाजराफॉलला जात होते.
विशेष म्हणजे विवेक मंदिर स्कूल या शाळेत दहावीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला बाईक-स्कुटी अशा वाहनांनी येण्यास मनाई आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत न येता परस्पर घरून तिकडे गेल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)