पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांचा ठोका वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:58+5:302021-01-23T04:29:58+5:30
केशोरी : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू ...

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांचा ठोका वाजणार
केशोरी : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंबंधी शाळा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आदेश दिला आहे. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हे सूत्र जिल्ह्यातील शिक्षण विभागाने स्वीकारुन त्याची अंमलबजावणी शाळा प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापकांना २१ जानेवारी रोजी पत्र देऊन इयत्ता ५ ते ८ पर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेशित केले आहे. त्यामध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक, शाळेतील हात धुण्याची पुरेशी सुविधा, ऑक्सिमीटर व थर्मलगन खरेदी करून दररोज विद्यार्थी व शिक्षकांच्या ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करणे व त्याची नोंद ठेवणे, पालकांचे संमतीपत्र, शालेय परिसर व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी शाळेत वावरताना किमान ६ फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक, वर्गामध्ये एका बाकावर एक अशी विद्यार्थी बैठक व्यवस्था करणे, शाळेत थुंकण्यास बंदी घालणे, विद्यार्थी व शिक्षकांना मास्क वापरणे अनिवार्य, शाळेत परिपाठ होणार नाहीत. विद्यार्थी शाळेत जेवणार नाहीत, लघवीला किंवा पाणी पिण्यासाठी विद्यार्थी एकत्र येणार नाहीत. शाळेत बाहेरुन येणाऱ्या अभ्यांगताना मनाई करणे, शाळेचा कालावधी ३ ते ४ तासापेक्षा अधिक असू नये, एका वर्गखोलीत २० ते ३० विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी, विद्यार्थी स्वत:च्या वस्तू वही, पेन, मास्क, पाणी बाॅटल एकमेकांना देणार नाहीत, याकडे शाळा प्रशासनासह शिक्षकांना लक्ष ठेवावे लागणार आहे.
शाळेत गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांचे अध्यापन कार्य विशेषत्वाने पार पाडावे. शाळा निर्जंतुकीकरणासह स्वच्छतेवर शिक्षण विभागाचा जोर असून, मास्क न वापरणाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याची ताकीद शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी शाळास्तरावरून नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.