शाळेत शिक्षकांची वानवा
By Admin | Updated: March 24, 2017 01:41 IST2017-03-24T01:41:15+5:302017-03-24T01:41:15+5:30
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून

शाळेत शिक्षकांची वानवा
शिक्षणाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष : खैरलांजी येथील विद्यार्थ्यांचे नुकसान
परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून या शाळेत शिक्षकांची उणीव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकऱ्यांकडून केली जात आहे.
शाळेतील सौंदर्यीकरणाची भिंत पडल्याने एक मुलगा जागीच मृत्यू झाला होता व त्याचीच बहीण जखमी झाली होती. प्रकरण मोठे तापले होते व तीन शिक्षकांवर प्रशासनाने ठपका ठेवून निलंबित केले होते. पण त्या ठिकाणी शिक्षक दिलेच नाही. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन शिक्षकांवर विशेष भर देत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी जिल्ह्यात ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम मागील चार वर्षापासून राबविण्यात आला. तर शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र हा उपक्रम राज्यभर सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘डीजीटल शाळा’ यावर विशेष भर दिला जात आहे. लोकसहभागातून जि.प.ची प्रत्येक शाळा डिजीटल केली जात आहे. मात्र जि.प. शाळेत शिक्षकांची उणीव राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते.
खैरलांजी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंत वर्ग असून या शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. प्रतिनियुक्तीवर चांदोरी खुर्द शाळेतील एक शिक्षक असे तीन शिक्षक अध्यापन कार्य करीत आहे. मुख्याध्यापकाला कार्यालयीन कामच सांभाळावे लागते. पोषण आहार याशिवाय एखादा शिक्षक अनुपस्थित असल्यास दोन शिक्षकांना ७ वर्ग सांभाळने शक्य नाही. यामुळे शिक्षक कार्यप्रणालीवर जि.प.च्या शिक्षण विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो व खासगी शाळेकडे धाव घेतात. फक्त कागदावर व अधिकाऱ्यांचा उदोउदोच दिसते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे का, पुरस्कार प्रदान करणे, घेणे-देणे एवढ्या पूरताच शिक्षण विभाग राहीला आहे. शाळेतील २८ विद्यार्थ्यांनी खासगी व दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी टी.सी. मागणीचे अर्ज मुख्याध्यापकांकडे दिले . (वार्ताहर)