सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस बंदच
By Admin | Updated: July 20, 2015 01:19 IST2015-07-20T01:19:45+5:302015-07-20T01:19:45+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूल बसेस संबंधित आगारांना देण्यात आल्या. गोंदिया आगाराच्यावतीने सदर शाळा बसेस चार तालुक्यात धावतात.

सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस बंदच
आणखी मिळणार आठ बसेस : खंडविकास अधिकाऱ्यांनी पत्रच दिले नाही
गोंदिया : मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूल बसेस संबंधित आगारांना देण्यात आल्या. गोंदिया आगाराच्यावतीने सदर शाळा बसेस चार तालुक्यात धावतात. मात्र शाळा सुरू होवून २० दिवसांचा कालावधी लोटूनही सालेकसा व गोरेगाव या दोन्ही तालुक्यांत अद्याप स्कूल बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रा.प. महामंडळाच्या गोंदिया आगाराला गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण २० स्कूल बसेस शासनाच्या मार्फत देण्यात आल्या आहेत. यावर्षी पुन्हा नवीन आठ स्कूल बसेस पुरविण्यात येतील, असे शासनाचे धोरण आहे. यापैकी दोन बसेस गोंदिया आगाराला प्राप्त झाल्या असून मानव विकास बसेसची संख्या आता २२ झाली आहे. तर पुन्हा सहा बसेस मिळणे बाकी असून त्या उपलब्ध झाल्यानंतर पुढील नियोजन ठरविण्यात येईल, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले आहे.
सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याबाबत आगार व्यवस्थापकांनी अनेकदा संबंधित तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले. मात्र तेथील खंड विकास अधिकाऱ्यांनी सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र अद्यापही गोंदिया आगाराला पाठविले नाही. त्यामुळे सदर दोन्ही तालुक्यात शाळा सुरू होवूनही स्कूल बसेस सुरू होवू शकल्या नाही, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले.
स्कूल बसेस सदर तालुक्यांमध्ये सध्या धावत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच फजिती होत आहे. गोंदिया आगाराच्यावतीने गोंदिया व आमगाव या तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांची स्कूल बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र गोंदिया आगाराला मिळाल्याने सदर दोन तालुक्यांत स्कूल बसेस धावत आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. मात्र शाळा सुरू होवूनही आपल्या तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याचे भान सालेकसा व गोरेगाव येथील खंड विकास अधिकाऱ्यांना नाही काय? असा प्रश्न तेथील विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत. आता कधी या तालुक्यांना बसेस मिळतात याकडे त्यांनी लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)