एसबीआयचे ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित
By Admin | Updated: April 27, 2015 00:36 IST2015-04-27T00:36:58+5:302015-04-27T00:36:58+5:30
भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडा येथे खाते उघडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी असते.

एसबीआयचे ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित
तिरोड्यात ग्राहकांची तारांबळ : सेवा केंद्रातून दिले जाते केवळ ओळखपत्र
गोंदिया : भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडा येथे खाते उघडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी असते. त्यामुळे बँकेतील काही कर्मचारी खाते उघडण्यासाठी नागरिकांना बँके समोरच असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात पाठवितात. मात्र या ग्राहक सेवा केंद्रातून खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका दिली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित आहेत.
ग्रामीण भागातील तसेच काही अल्पशिक्षित व काही वृद्ध व्यक्तींना एटीएम मशीन संचालित करता येत नाही. त्यामुळे त्यांना तिथून पैसे काढणे किंवा इतर प्रक्रिया करणेसुद्धा समजत नाही. असा एखादा व्यक्ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला तर फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्यांचीही काही कमी नाही. शिवाय खातेपुस्तिका नसल्याने आपल्या खात्यात किती रूपये जमा झाले किंवा किती रूपये काढण्यात आले, हे सुद्धा त्यांना कळत नाही. सर्वच शिक्षीत नसल्याने किंवा सर्वांनाच एटीएमची प्रक्रिया समजत नसल्याने खाते पुस्तिकेअभावी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना खातेपुस्तिका देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तिरोडा तालुक्यात लाखेगाव, ठाणेगाव, गराडा, करटी आदी गावांमध्ये एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र आहेत. बेलापूर येथील मायक्रोफायनंस कंपनीमार्फत ते नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर मायक्रोफायनंस कंपनी व भारतीय रिझर्व बँक यांच्यात करार असल्याचे ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकाने सांगितले. मात्र ग्राहक सेवा केंद्रातून बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका अद्याप का देण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ग्राहक भारतीय स्टेट बँक तिरोडा येथे जातात, ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेले ओळखपत्र दाखवून खातेपुस्तिकेची मागणी करतात. मात्र तुम्ही जिथून खाते उघडले तिथे जावून पुस्तिका मागा, असे सांगून बँकेचे कर्मचारी ग्राहकांना परत पाठवितात. या प्रकारामुळे बँक ग्राहकांची तारांबळ उडत आहे. खाते सेवा केंद्रामार्फत उघडले असो किंवा सरळ बँकेतून उघडले असो, शेवटी जमा केलेले पैसे बँकेतच जमा होतात. मग खातेपुस्तिका का दिली जात नाही, असा सवाल ग्राहकांनी केला आहे. या प्रकाराबाबत भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडाचे व्यवस्थापक गजभिये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. (प्रतिनिधी)
बँक व्यवस्थापकाच्या कार्यालयात ३५ ते ४० अर्ज
याबाबत तिरोडा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अजयकुमार रणगिरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की आम्ही पैसे घेवून नागरिकांना भारतीय स्टेट बँकेचे खाते उघडून देतो. तसेच त्यांना बँक खाते क्रमांक असलेले एक ओळखपत्र देतो. पोस्टाने एटीएम कार्ड आल्यावर याच कार्डाद्वारे सर्व प्रक्रिया ग्राहकांना करावी लागते. तसेच ज्या ग्राहकांना खातेपुस्तिकेची गरज असते, त्यांच्याकडून अर्ज घेवून भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडाच्या व्यवस्थापकांना ते अर्ज पोहचविले जाते. परंतु ग्राहक सेवा केंद्रातून खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका का पुरविली जात नाही, हे कळत नाही. सुरूवातीला ज्यांना अत्यंत आवश्यकता होती, त्या दोन ग्राहकांना बँकेकडून खातेपुस्तिका देण्यात आली. यानंतर ग्राहक सेवा केंद्रात खातेपुस्तिकेसाठी ३५ ते ४० ग्राहकांचे अर्ज आले. ते सर्व अर्ज एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेवून दिले. मात्र अद्यापही त्यांना बँकेकडून खातेपुस्तिका देण्यात आले नाही किंवा तयारही करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.
जन-धन योजनेचे सर्वच ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित
सर्वसामान्य नागरिकांना बँकेत शून्य रूपयांत खाते उघडता यावे व विविध लाभ घेता यावे म्हणून प्रधानमंत्री जन-धन योजना शासनाने सुरू केली. मात्र तिरोडा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रामार्फत जन-धन योजनेची खाती उघडणाऱ्या सर्वच ग्राहकांना खातेपुस्तिकेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या खात्यांमध्ये ग्राहकांनी रूपये जमा करणेसुद्धा सुरू केले आहे. रूपये जमा असल्यावरही बँक खातेपुस्तिका देत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये रोष व्याप्त आहे. इतर बँक या योजनेचे खाते उघडणाऱ्या ग्राहकांना पुस्तिका उपलब्ध करून देतात, मग स्टेट बँक का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शिवाय या योजनेचे एटीएम कार्ड तीन-तीन महिने लोटूनही मिळत नसल्याने आर्थिक व्यवहार करणे कठिण होत आहे. सर्वच प्रकारच्या ग्राहकांना भारतीय स्टेट बँक शाखेने खातेपुस्तिका उपलब्ध करून द्यावे व त्यावर आर्थिक व्यवहाराची छपाईसुद्धा बँकेमार्फतच करण्यात यावी, अशी ग्राहकांची मागणी जोर धरत आहे.