पांगोली वाचवा सिंचन क्षमता वाढवा
By Admin | Updated: January 5, 2015 23:07 IST2015-01-05T23:07:30+5:302015-01-05T23:07:30+5:30
पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट

पांगोली वाचवा सिंचन क्षमता वाढवा
गोंदिया : पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हा सीमेवर वाघ नदीत तिचा विलय होतो. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी पिकासाठी पांगोली नदीच्या पाण्यात अवलंबून असतात. हजारो शेतकरी कुटुंबांचा या पाण्यावर उदरनिर्वाह चालतो. मात्र सद्यस्थितीत ही नदी प्रदूषणग्रस्त झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांवर भविष्यात संकट येवू शकते. मात्र या नदीला वाचविण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत.
पांगोली नदीच्या पुनरूत्थानासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने पुढाकार घेत नदीचे निरीक्षण केले. यात त्यांना नदीचे पात्र उथळ होत चालले असून काठावरील गावात व शहरात पाण्याची पातळी सतत खालावत आहे. नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असून काठावरील वृक्षांच्या अवैध कत्तली होत आहेत. त्यामुळे नदीचे काठच नष्ट होत आहे.
काठावरील माती नदीत साचल्याने खोली कमी झाली. शिवाय शासनाने अद्यापही या नदीवर कुठेही बांध किंवा बंधारे बांधले नाही. त्यामुळे पाणी कुठेही अडविले जात नसून सरळ वाहून जाते व परिसरातील पाण्याच्या पातळीवर दुष्परिणाम होत आहे.
पांगोली नदी व सहायक नाल्यांवर दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण व सांडपाणी पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्पांची शासनाकडून उभारणी न करण्यात आल्याने पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पाळीव पाण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
या प्रकारामुळे काठावरील शेतपिकांना वर्षभर पाणी मिळत नाही. त्यामुळे फक्त खरीप हंगामातच केवळ धानपीक घेतले जाते. रबी किंवा उन्हाळी पीक फळभाज्या, पालेभाज्या, इतर नगदी पिके, कडधान्य व तृणधान्य घेण्याचे धाडसच शेतकरी करीत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरत आहे. शिवाय शेतीकामे सोडून शेतकरी मोल-मजुरीच्या कामावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
कारखाने व आरोग्यावर दुष्परिणाम
शहरातून वाहणाऱ्या या नदीकाठावर व मिळणाऱ्या नाल्यांकाठी राईस मिल्स, चामडे उद्योग, लाख कारखाने, टाईल्स कारखाने व प्रशासकीय मंजुरी असलेले इतर कारखाने आहेत. या कारखान्यांतून वाहणारे दूषित पाणी व राईस मिलच्या राखेमुळे नदी प्रदूषित होत आहे. त्या पाण्याचा वापर नागरिक व जनावरे करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. राईस मिलच्या चिमणीतून सतत निघणाऱ्या धुरापासून वायू प्रदूषण होत आहे. शिवाय याच पाण्याचा वापर काठावरील शेतपिकासाठी होत असल्याने नापिकी वाढत आहे.